Menu Close

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील प्राचीन श्री गणेश मंदिर रस्ता रुंदीकरणासाठी काढून टाकण्याचा ओडिशा सरकारचा प्रस्ताव

रस्ता रुंदीकरणासाठी एखादी मशीद, दर्गा काढून टाकण्याचा प्रस्ताव आल्यावर त्यावर कधीही कृती होत नाही आणि रस्ताही कधी रुंद होत नाही, अशी अनेक उदाहरणे या देशात आहेत; मात्र हिंदूंची मंदिरे आली, तर ती कोणाचीही भीडभाड न ठेवता काढून टाकण्यात येतात !

प्राचीन श्री गणेश मंदिर

भुवनेश्‍वर (ओडिशा) : येथील लिंगराज कॉम्प्लेक्स सभोवती बरीच मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लिंगराज कॉम्प्लेक्सच्या उत्तर दिशेला असलेले पवित्र श्री गणेश मंदिर रस्ता रुंदीकरणासाठी काढून टाकण्याचा बिजू जनता दल सरकारचा प्रस्ताव आहे. हे गणेश मंदिर ११ व्या शतकातील असून लिंगराज मंदिराच्या समकालीन आहे. जुन्या शहरातील कित्येक वर्षे जुन्या संरक्षित स्मारकांमध्ये या मंदिराचे नाव आहे.

१. सध्या हे मंदिर येथील बी.एम्. हायस्कूलच्या परिसरात आहे. या मंदिराची उंची ७ फूट असून बरेच प्राचीन आहे. बी.एम्. हायस्कूलची स्थापना वर्ष १९४० मध्ये झाली आहे. या मंदिरात असलेल्या ३ फूट उंचीच्या श्री गणेशमूर्तीला गेली कित्येक वर्षे शाळेतील विद्यार्थी पूजतात. या मंदिरात नवग्रहांच्या लहान प्रतिमा असून त्याच्या प्रवेशद्वारावर कीर्तीमुख आहे. तसेच या मंदिरात प्राचीन हनुमानाची मूर्ती आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतात. सरकारने या मंदिराभोवतालची भूमी खणून काढली असून या मंदिरातील मूर्ती शाळेच्या आगाशीत बसवण्यासाठी एक लहान चबुतरा बांधला आहे. या शाळेच्या काही खोल्याही काढून टाकल्या आहेत. मंदिरातील मूर्ती हालवल्यानंतर येत्या काही दिवसात हे मंदिर पाडण्यात येणार आहे.

२. येथील ‘बे ऑफ बेंगाल इनिशिएटीव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉ ऑपरेशन डिझास्टर मॅनेजमेंट’ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘जुना वारसा असलेली स्थळे आपली सांस्कृतिक ओळख दाखवतात. आपल्या आर्थिक व्यवहाराला त्यामुळे चालना मिळते. कोणतीही किंमत देऊन पुढच्या पिढीसाठी ही स्थळे राखून ठेवली पाहिजेत.’’ या पार्श्‍वभूमीवर एवढी वर्षे शाळेच्या परिसरामध्ये असलेले हे मंदिर काढून टाकणे हे आश्‍चर्यकारक आहे. शाळेच्या आगाशीमध्ये कोणताही अडथळा न येता ते मंदिर तसेच ठेवता येईल.

श्री. अनिल धीर

पुरातत्व खाते बघ्याची भूमिका घेत आहे ! – ज्येष्ठ पत्रकार अनिल धीर

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘इनटॅक’चे श्री. अनिल धीर यांच्या म्हणण्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाने अशा कृती थांबवल्या पाहिजेत. आधुनिकीकरणाची प्रक्रिया थांबवून वारसा स्मारकांचे योग्य मूल्यांकन केले पाहिजे. ही मौल्यवान स्मारके नष्ट होत असतांना पुरातत्व खाते बघ्याची भूमिका घेत आहे. आधीच बरेच काही नष्ट झाले आहे त्यात सरकारने अजून काही वारसा स्मारके नष्ट करण्याचे नियोजन केले आहे.

‘इनटॅक’चे राज्यातील समन्वयक ए.बी. त्रिपाठी म्हणाले, ‘‘मंदिर काढून टाकणे आवश्यक आहे, तर ते पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी योग्य यंत्रणेकडून दुसर्‍या जागी बांधले पाहिजे. आधुनिकीकरण किंवा विकास करतांना सरकारने इतिहास तज्ञ आणि पुरातत्व विभागातील तज्ञ यांचा सल्ला घेतला पाहिजे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *