चीनमध्ये भ्रष्टाचार्यांना फाशी होऊ शकते, तर भारतात का नाही ?
बीजिंग (चीन) : चीनमध्ये २ सहस्र १९ कोटी ५३ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणी एका माजी बँक अधिकार्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.
ली शिऑमीन असे या अधिकार्याचे नाव आहे. तो चीनमधील सर्वांत मोठी संपत्ती व्यवस्थापन संस्था असणार्या हुआरोंगमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. ली शिऑमीन यांना उत्तरेतील तिआनजीन शहरामध्ये फाशी देण्यात आली. ‘ली शिऑमीन यांनी लाच म्हणून घेतलेली रक्कम फारच मोठी आहे, तसेच ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी लाच स्वीकारली तो गंभीर गुन्हा आहे. याचा समाजावर मोठा परिणाम होऊ शकतो’, असे चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावतांना म्हटले होते. ली शिऑमीन यांनी सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालायने फेटाळून लावली होती. चीनमधील न्यायालयांमध्ये आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण हे ९९ टक्के इतके आहे; मात्र असे असले, तरी येथे फार गंभीर गुन्ह्यांसाठीच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात