चिंचवड (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) – येथील गोखले सभागृहामध्ये ‘आपत्काळासाठी संजीवनी असणारा प्रथमोपचार’ शिकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये प्रथमोपचार म्हणजे काय ? प्रथमोपचाराचे महत्त्व आणि आवश्यकता, आदर्श प्रथमोपचार पेटी कशी असावी ? रुग्णाचा श्वास आणि नाडी कशी पडताळावी ? अशा विविध विषयांवर समितीच्या सौ. भावना सावळ यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा अनेक शिबिरार्थीनी लाभ घेतला.
या वेळी शिबिराचा उद्देश सांगतांना सौ. रेवती पेठे म्हणाल्या की, आपद्प्रसंगी स्वतःचे, कुटुंबियांचे, समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे रक्षण करता यावे, यासाठी कुटुंबातील एकाने तरी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनात भाजणे, रस्त्यावरील अपघात, हृदयविकाराचा झटका येणे, विजेचा धक्का बसणे आदी आकस्मिक घटनांमध्ये वेळीच प्रथमोपचार केल्यास रुग्णाचे जीवितरक्षण होण्यास साहाय्य होते.
प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके !
या वेळी पालथ्या स्थितीतील रुग्णाला उताणे कसे करायचे ? हाताच्या बोटांचा किंवा गळपट्टीच्या हाडाचा अस्थीभंग झाल्यास त्रिकोणी पट्टीचा उपयोग करून उंचावलेली झोळी कशी बांधायची, घशामध्ये आगंतुक वस्तू अडकून गुदमरलेल्या; परंतु शुद्धीत असलेल्या रुग्णावर प्रथमोपचार कसे करायचे ? याची प्रात्यक्षिके सौ. हेमलता म्हात्रे यांनी दाखवली.
शिबिरार्थींचे मनोगत
‘शिबिराच्या माध्यमातून प्रथमोपचार शिकणे किती आवश्यक आहे’, याचे गांभीर्य निर्माण झाले, तसेच ही सर्व माहिती अतिशय सोप्या पद्धतीने समजली. ‘काळाची आवश्यकता म्हणून सर्व ठिकाणी हे प्रशिक्षण पोचणे महत्त्वाचे आहे’, असे मनोगत शिबिरार्थींनी व्यक्त केले.
१. कु. मानसी अनिल तिकोने – उत्तम प्रकारे विशेषतः मराठी भाषेमध्ये माहिती मिळाली.
२. सौ. राजश्री भरत लोहार – प्रथमोपचार शिबिरामधून पुष्कळ काही शिकायला मिळाले. ‘एक स्त्री शिकली की, संपूर्ण कुटुंब शिकते’, यामुळे प्रत्येक स्त्री, तसेच मुली यांनी शिकले पाहिजे. असे प्रथमोपचारवर्ग चालू असल्यास सांगा, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गही चालू करा.
३. श्री. विजय नथोबा पवार – हे प्रथमोपचार शाळा, कॉलेज मध्ये शिकवणे आवश्यक आहे, तसेच गणेशोत्सवकाळात गणेशोत्सव मंडळांतही अशी शिबिरे घ्यायला हवीत.
४. सौ. सोनाली चौधरी – विषय सर्व वयोगटाला समजेल, अशा सोप्या भाषेत सांगितला. धन्यवाद !