आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण !
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी महाड येथे मनुस्मृति दहन केली; मात्र मनुस्मृति दहन करत असतांनाच आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. याविषयी त्यांनी क्षमा मागितली असली, तरी आता राज्यात भाजपच्या वतीने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. राजकीय नेत्यांकडून आव्हाड यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.
सांगली आणि मिरज येथे निदर्शने !
सांगली – येथील शास्त्री चौक येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारले. या वेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, पृथ्वीराज पवार, जगन्नाथ ठोकळे, महिला आघाडीच्या अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, महाराष्ट्र नव्हे, तर देशाविषयी ही दुर्दैवी घटना घडली आहे. डॉ. आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्यांच्या नावाने जे लोक मते मिळवतात, त्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा घोर अवमान केला आहे.
मिरज – मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी निदर्शने केली. या वेळी ‘आव्हाड यांनी तात्काळ आमदारकीचे त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी माजी महापौर सौ. संगीताताई खोत यांनी केली. या वेळी माजी नगरसेवक सर्वश्री गणेश माळी, पांडुरंग कोरे यांसह सर्वश्री जयगोंड कोरे, आप्पा झांबरे, दिगंबर जाधव, शशिकांत वाघमोडे यांसह महिला आघाडीच्या सौ. रूपाली देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कागल येथे तहसीलदारांना निवेदन !
कागल (जिल्हा कोल्हापूर) – येथे तहसीलदार प्रदीप वाकडे यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी मनसेचे तालुकाप्रमुख श्री. विनायक आवळे, विभागप्रमुख श्री. शुभम माळी आणि श्री. अमोल आवळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण कुलकर्णी, श्री. बाबासाहेब भोपळे, भारतीय किसान संघाचे श्री. बाबय्या स्वामी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सचिन मोरे, नितीन ठोंबरे, सागर श्रीखंडे, दीपक भोपळे, शिवगोंडा पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
नागपूर येथे आव्हाड यांच्या प्रतिमेला मारले जोडे !
नागपूर – आव्हाड यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता धर्मपाल मेश्राम यांनी ३० मे या दिवशी येथे केली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी अधिवक्ता मेश्राम यांनी आव्हाड यांच्या कृत्यावर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: स्पष्टीकरण द्यावे’, अशीही मागणी केली.
चैत्यभूमी येथे छायाचित्रे जाळून रिपब्लिकन पक्षाकडून आव्हाड यांचा निषेध !
मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ३० मे या दिवशी चैत्यभूमी येथे जितेंद्र आव्हाड यांची छायाचित्रे जाळून निषेध व्यक्त केला. जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्रांवर ‘जातीयवादी दलाल’ असे लिहिलेल्या आव्हाड यांच्या चित्रांचे या वेळी दहन केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य क्षमा करण्यासारखे नाही. आव्हाड यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे’, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे.
राज्यात अन्य ठिकाणी निषेध !
सोलापूर शहरात महायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली, तर पंढरपूर येथे महायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरात जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. आव्हाड यांच्या विरोधात ठाणे येथील वसंत विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपची निदर्शने !
कोल्हापूर – ‘जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा’, या मागणीसाठी कोल्हापूर भाजपच्या वतीने बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘वाचाळवीर जितेंद्र आव्हाडचे करायचे काय ? खाली डोके वर पाय’ इत्यादी जोरदार घोषणा दिल्या. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम यांसह उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, गणेश देसाई, आप्पा लाड, राजू मोरे, अमर साठे, दिग्विजय कालेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात