हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्यांना हिंदु विचार परिषदेद्वारे उत्तर देऊ ! – सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
रामनाथ देवस्थान : सद्य:स्थितीत साम्यवादी लोक परिस्थितीनुसार कोणते कथानक (नॅरेटिव) वापरायचे, कसे वापरायचे, त्यासाठी ‘टूलकिट’चा (कृती कार्यक्रम सिद्ध करण्याचा) पद्धतशीरपणे उपयोग करत आहेत. साम्यवादी खोट्याला खरे करण्यासाठी कथानकाचा उपयोग करून प्रसारमाध्यमे, राजकारणी आदींच्या माध्यमातून समाजाला संभ्रमित करतात. याउलट आपण आपल्यावरील अन्यायही समाजापर्यंत पोचवण्यात अल्प पडतो. ही उणीव भरून काढण्यासाठी या अधिवेशनाला आलेल्या काही विचारवंतांच्या सहकार्याने ‘हिंदु इंटलेक्चुअल फोरम’ची (हिंदु विचार परिषदेची) स्थापना झाली आहे. भविष्यात हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्यांना या संघटनेच्या माध्यमातून उत्तर देऊ, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या उद़्घाटन सत्रात केले.
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण सूत्रे
हिंदु समाज स्वतःचे दायित्व विसरला आहे !
यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे भाजपसह हिंदुत्वासाठी काम करणार्या आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. हिंदुत्वाविषयी जागरूक असलेल्या हिंदूंच्या एका वर्गाला असे वाटते, ‘आता केंद्रात आपले सरकार आहे, तर सर्व काही होईल. आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही.’ दुसर्या वर्गाला, ‘जे व्हायला हवे ते होत नाही; पण पुढे काही तरी होईल’, असा विचार करून तो आशावादी राहतो. एकंदरीत हिंदु समाज हे गृहीत धरतो किंवा कुणावर तरी अवलंबून राहतो आणि आपले दायित्व विसरतो. त्यामुळे मग ते मतदान करणे असो किंवा सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदूंच्या हिताचे काम करून घेणे असो. यामध्ये आपल्याला पालट करावे लागतील.
हिंदूंवरील अन्याय प्रभावीपणे कसे मांडता येतील, याचा अभ्यास करावा लागेल !
या लोकसभेत देशद्रोहाचा आरोप असलेला खलिस्तानी आतंकवादी अमृतपाल, काश्मीर तोडण्यासाठी प्रयत्नरत रशीद इंजिनीयर आणि गोव्यावर राज्यघटना थोपवण्यात आली आहे, असे म्हणणारे कॅप्टन विरियाटो फर्नाडिस खासदार म्हणून निवडून आले आहेत. ही देशासाठी अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे देशातील कायद्यांमध्ये काही आमूलाग्र परिवर्तन आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०२३ मध्ये सांगितले होते की, दुसर्या धर्माविषयी तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे, हा गुन्हा आहे. सनातनद्वेष्ट्यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या विखारी वक्तव्यांवर कारवाई होत नाही; पण सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या सभेत लोकांना हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यायला सांगितली; म्हणून त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा (द्वेषयुक्त भाषण केल्याचा) गुन्हा नोंदवण्यात आला. भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह, हिंदु जनजागृती समितीचे काही वक्ते यांच्यावरही अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामुळे आता आपल्यावरील अन्याय सांगतांनाही सजग रहावे लागणार आहे. कायद्याच्या कचाट्यात न अडकता हिंदूंवरील अन्याय प्रभावीपणे कसे मांडता येतील, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल.
सतर्कता, आक्रमकता आणि विस्तारवादी नीतीनेच हिंदु धर्माची सुरक्षितता शक्य ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, संस्थापक, श्री स्वामी अखंडानंद जी गुरुकुल आश्रम, इंदूर, मध्यप्रदेश
हिंदू आक्रमक आणि विस्तारवादी नव्हते, हे खोटे आहे. दसर्याच्या दिवशी आपले पूर्वज केवळ गावाचे सीमोल्लंघन करत नव्हते, तर देशाच्या सीमेचेही उल्लंघन करत होते. मातृभूमीविषयी संकुचित भावना आपणाला विस्तारवादी होण्यापासून रोखत आहे. त्यासाठी हिंदूंना विस्तारवादी व्हावेच लागेल. हिंदू सतर्क नाहीत. ‘आजूबाजूला काय घडते ?’, याविषयी हिंदूंनी सतर्क असायला हवे. मुंग्यांकडून आपण हे शिकायला हवे. मुंग्या कुठल्याही अन्य प्राण्याला स्वत:च्या घरात घुसू देत नाहीत. कुणी त्यांच्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केला, तर त्या आक्रमण करतात आणि बिळाच्या बाहेरच त्याला नष्ट करतात. ही सजगता आणि आक्रमकता हिंदूंनी स्वत:मध्ये आणायला हवे. कुटुंब, भूमी, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी सजग असायला हवे. आपल्या धर्मावरही कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला, तर आपण आक्रमक असायल हवे, असे मार्गदर्शन मध्यप्रदेशातील इंदूर येथील श्री स्वामी अखंडानंद, गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी केले. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात ‘धर्मांतर रोखण्यासाठी आदिवासी क्षेत्रामध्ये केलेले कार्य’ या विषयावर बोलतांना केले.
महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनातील ठळक सूत्रे
हिंदु राष्ट्रासाठी हिंदुऐक्य आवश्यक !
ते पुढे म्हणाले की, हिंदूऐक्याविना हिंदु राष्ट्राचे स्वप्न आपण साकार करू शकत नाही. हिंदूंनी एक होणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व हिंदूंमध्ये एकीची भावना असायला हवी. आपण वेगवेगळ्या जातीचे, संप्रदायाचे असलो, तरी आपल्यामध्ये एकीची भावना असायला हवी. हिंदूएकतेच्या भावनेला आपण शक्तीशाली करायला हवे.
हिंदु धर्मानुसार आचरण करणे आवश्यक !
हिंदूंमध्ये नास्तिकता, विद्रोहीपणा वाढत आहे. ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. अधिकतांश हिंदूंना धर्मशिक्षण नाही. हिंदू धर्मांतर करत आहेत, हीदेखील चिंतेची गोष्ट आहे. गरिबी हे धर्मांतराचे कारण नाही, तर धर्महीनतेमुळे हिंदूंचे धर्मांतर होत आहे. हिंदु धर्म समजून घेणे आणि त्यानुसार आचरण करणे महत्त्वाचे आहे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य आहे. जीवनात नैतिकतेला आणणल्याविना आपण भारताला हिंदु राष्ट्र करू शकत नाही. आपले जीवन आणि व्यवहार चारित्रसंपन्न असायला हवा, तरच आपण हिंदु धर्माचा प्रचार प्रभावीपणे करू शकतो. प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपणाला सनातन धर्म आणि आपल्या धर्माचे ज्ञान पोचवायचे आहे.
सनातन संस्थेचे कार्य दैवी !
सनातन संस्थेच्या मागे दैवी शक्ती आहे. दैवी शक्तीमुळेच सनातन संस्थेचे कार्य होत आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे तपस्वी महापुरुष आहेत. त्यांच्या कार्यामागे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची शक्ती आहे. – महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती
पाश्चात्त्यांची वैज्ञानिक प्रगती भारतीय ज्ञानावर आधारित ! – डॉ. नीलेश ओक, इन्स्टीट्यूट ऑफ एडवांस्ड सायंंसेज, अमेरिका
सनातन धर्म शब्दप्रामाण्यावर आधारित आहे; परंतु प्रत्यक्ष प्रमाणही महत्त्वपूर्ण आहे. आपल्या ऋषीमुनींनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, तेच त्यांनी शब्दप्रमाण म्हणून सांगितले आहे. त्यामुळे आपले शब्दप्रमाण हे ऋषीमुनींचे प्रत्यक्ष प्रमाण आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. या शब्दप्रमाणाचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. सद्य:स्थितीत युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली, तरी हे ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आले आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करूनच पाश्चात्त्यांनी विज्ञान क्षेत्रात प्रगती केली आहे. रामायण आणि महाभारत यांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशांतील ५००-६०० विद्यापिठांमध्ये रामायण आणि महाभारत ग्रंथांच्या प्रती आहेत. तेथील लोक त्यांचे अध्ययन करतात. आपण मन आणि बुद्धी यांमधील संशय काढून टाकायला हवा. आपण बुद्धीसाठी सत्य, शरिरासाठी सेवा आणि मनासाठी संयम अंगीकारायला हवा, असे वक्तव्य अमेरिकेतील इन्स्टीट्यूट ऑफ एडवांस्ड सायंंसेजमध्ये कार्यरत असलेले डॉ. नीलेश ओक यांनी केले. ते ‘विश्वगुरु भारताचे बलस्थान : सनातन हिंदु धर्म’ या विषयावर बोलत होते.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये नवीन उत्साह संचारेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई
भारतात नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसर्यांदा केंद्रात सरकार स्थानापन्न झाले आहे. या सरकारला खासदारांचे अपेक्षित संख्याबळ न मिळाल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये थोडा निरुत्साह निर्माण झाला आहे; परंतु आता चालू झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मुळे हा निरुत्साह दूर होऊन देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक नवीन उत्साह संचारला जाणार आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या उद़्घाटन सत्रात केले. ‘हिंदू करत असलेल्या उद्योगांना हिंदूंनीच उत्तेजन देणे आवश्यक’, या विषयावर ते बोलत होते.
आपल्याला हिंदु राष्ट्र आयते मिळणार नाही, तर ते संघर्ष करूनच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला अभ्यास आणि हिंदुसंघटन करणे आवश्यक आहे. महाभारतात १२ वर्षांच्या वनवासानंतर पांडवांनी शमी वृक्षावरून शस्त्रे काढली होती, तो एक महोत्सव होता. त्याप्रमाणे आताही हिंदूंना शस्त्रे काढून हिंदुविरोधी कथानक नष्ट करायचे आहे. ही पारंपारिक शस्त्रे नसून वैचारिक स्वरूपाची आहेत. त्यात आर्थिक शस्त्र सर्वांत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मुसलमानांनी निर्माण केलेल्या समांतर अर्थव्यस्थेला टक्कर देण्यासाठी हिंदुुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून ‘ॐ शुद्ध प्रमाणपत्र’ हिंदु दुकानदारांना देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ते केवळ हिंदु दुकानदारांना देण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसलमान दुकानदारांची प्रसादाची दुकाने असतात. त्यांच्याकडील प्रसाद शुद्ध आणि पवित्र असेल, असे सांगता येत नाही. त्यामुळे देवाला शुद्ध आणि पवित्र प्रसादच अर्पण होण्यासाठी ही चळवळ राबवण्यात येत आहे.