सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना मिळालेला ‘भारत गौरव पुरस्कार’ हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचा सन्मान ! – सद़्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सनातन संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. सनातन संस्था ही धर्मकार्याची प्रसार आणि प्रचार करणारी संस्था आहे. सनातन संस्था जिज्ञासूंना आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना शिकवते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सनातन संस्थेने देशभर गावागावांत साधनासत्संग चालू करून लोकांना साधनेचे महत्त्व सांगितले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेने विविध विषयांवर ग्रंथनिर्मिती केली आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ प्रकाशित करून ‘हिंंदु राष्ट्रा’चा विचार समोर ठेवला. सनातन संस्थेच्या दिव्य कार्याची कीर्ती आता विदेशातही पसरली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या वैश्विक कार्यामध्ये सनातन संस्थेच्या अद्वितीय योगदानामुळे ५ जून २०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचा हा सन्मान आहे.
आज सर्वजण कथानक युद्धात सहभागी होऊ शकतात ! – श्री. संतोष केचंबा, संस्थापक, राष्ट्र धर्म संघटना, कर्नाटक
विद्याधिराज सभागृह – ‘नॅरेटिव्ह वॉर’ (खोटी कथानके पसरवण्याचे युद्ध) हे काही नवीन नाही. अगदी १८ व्या शतकातही भारताविषयी चुकीचे समज अन्य देशांमध्ये पसरवण्यात आले होते. आज जगात सर्वांत मोठे ‘विद्यापीठ’ म्हणजे ‘व्हॉट्सअॅप’ झाले आहे. आज जगातील मुख्य प्रसारमाध्यमांचे अधिपत्य नाहीसे होऊन समाजिक माध्यमांचे आधिपत्य वाढले आहे. एलन मस्क (टेस्लासारख्या जगप्रसिद्ध आस्थापनांचे मालक) यांनी म्हटले आहे, ‘सर्वसामान्य लोकच आज कथानके निर्माण (‘सेट’) करू शकतात किंवा त्यात पालट करू शकतात. ते तुमच्या आमच्या हातात आहे.’ आज सर्वसामान्य लोक संघर्ष, घटना, कुठल्याही चांगल्या-वाईट प्रसंगात प्रथम भ्रमणभाष बाहेर काढतात. आज सर्व जण पत्रकार झाले आहेत. कथानक युद्ध (‘नॅरेटिव्ह वॉर’) पुष्कळ महत्त्वाचे आहे. आज सर्व जण सनातनचे साधक बनू शकत नाहीत; परंतु (धर्मकार्य करण्यासाठी) या कथानक युद्धात नक्की सहभागी होऊ शकतात, असे उद़्गार बेंगळुरू, कर्नाटक येथील ‘राष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक श्री. संतोष केचंबा यांनी काढले. वैश्विक हिंदु महोत्सवात २५ जून या दिवशीच्या द्वितीय सत्रात ‘सामाजिक माध्यमांमध्ये हिंदुविरोधी प्रसाराचा सामना कसा करावा ?’ या विषयावर ते बोलत होते.
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन भारताविषयीची खोटी कथानके हाणून पाडले !
१८ व्या शतकातही संपूर्ण जगामध्ये ‘भारतात जुनाट, भारताला मागे नेणार्या पूजा-अर्चा केल्या जातात. तिथे अस्पृशता आहे, तिथे स्त्रियांचा आदर केला जात नाही’, अशा प्रकारची अनेक खोटी कथानके पसरवण्यात आली होती. एक संत अमेरिकेत गेले आणि त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी ही सर्व खोटी कथानके खोडून काढली आणि त्यांचे शक्तीप्रदर्शन केले. ते संत म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून स्वामी विवेकानंद हे होते !
हिंदु धर्म टिकवणार्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – १०८ निळकंठ शिवाचार्यजी महाराज, पाटण, महाराष्ट्र
पूर्वी हिंदु धर्म अफगाणिस्तानपर्यंत पसरला होता. ज्यांनी हिंदु धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न केले, त्या पूर्वजांचा आपल्याला विसर पडला आहे. त्यांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन १०८ निळकंठ शिवाचार्यजी महाराज यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी केले.
१०८ निळकंठ शिवाचार्यजी महाराज म्हणाले, ‘‘दुसर्यांच्या मतांवर विश्वास ठेवून हिंदू विविध जात, संप्रदाय, संघटना, पक्ष यांत विभागले गेले आहेत. आपण सर्व एक आहोत’, हा मंत्र लक्षात ठेवून सर्वांनी संघटित झाले पाहिजे. हिंदू सतत विभागला जावा, यासाठी षड्यंत्र रचून प्रयत्न केले जातात. हे षड्यंत्र ओळखून हिंदूंनी केवळ हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासमवेतच आपल्या देशात विविध संप्रदाय आहेत. त्या सर्व संप्रदायांनी ‘आपण केवळ हिंदू आहोत’, हे लक्षात ठेवून संघटित झाले पाहिजे. आपण सर्व शिवापासून निर्माण झालो आहोत. त्यामुळे आपले सर्वांचे एकच कुळ आहे.’’
प.पू. डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत आणून ठेवले आहे ! – १०८ निळकंठ शिवाचार्यजी महाराज
हिंदू दान, पूजा, जप आणि ध्यान विसरले आहेत. हे सर्व सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी आचरणात आणले. त्यांनी अनेक आबाल वृद्धांना एकत्र केले आणि सनातन संस्थेला ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय करून २५ वर्षांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत आणून ठेवले.
संस्कार आणि संस्कृती यांमुळेच लव्ह जिहाद रोखता येईल ! – छाया आर्. गौतम, जिल्हाध्यक्षा, हिंदु महासभा, मथुरा, उत्तरप्रदेश
हिंदू लहान वयात त्यांच्या मुलींना भगवद़्गीता का शिकवत नाहीत ? ‘परधर्मापेक्षा स्वधर्म श्रेष्ठ आहे’, याची शिकवण भगवद़्गीतेमध्ये देण्यात आली आहे. हे शिक्षण मिळाले, तर हिंदु युवती लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. कायद्याने नाही, तर संस्कार आणि संस्कृती यांमुळेच लव्ह जिहादला रोखता येईल. उत्तरप्रदेशमध्ये प्रथम लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात आला; मात्र पोलिसांकडून या कायद्यानुसार कलमे लावली जात नव्हती. लव्ह जिहादच्या एका प्रकरणात पोलिसांना कायद्याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या कायद्याची कलमे लावली, ही स्थिती आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांतून बाहेर येण्यासाठी हिंदु युवतींचे सपुदेशन करणे आवश्यक आहे. लव्ह जिहादमध्ये फसलेल्या ४०-५० मुलींचे मी समुपदेशन केले. हे वाया गेले नाही. हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदूंच्या संघटनाचे कार्य अतिशय मोठे आहे. सद्य:स्थितीत या कार्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य हिंदु महासभेच्या उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्हाध्यक्षा छाया आर्. गौतम यांनी केले. त्यांनी ‘लव्ह जिहादला रोखण्यासाठी केलेले प्रयत्न’ हा विषय मांडला.
मंदिरांच्या माध्यमातून हिंदू एकत्र आले, तर हिंदु राष्ट्र नक्की येईल ! – श्री. काशी विश्वनाथन्, सचिव, श्री अंजनेय सेवा समिती, पलक्कड, केरळ
केरळमधील पलक्कड किल्ल्याजवळ अंजनेय मंदिर हे छोटे मंदिर आहे. वर्ष २००६ मध्ये तत्कालीन केरळ सरकारच्या कह्यातून आम्ही ते सोडवले. हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. येथील भक्तांची संख्या वाढल्याने हे मंदिर कह्यात घेण्याचा आदेश तत्कालीन सरकारने काढला होता. त्या वर्षी जुलै महिन्यात एके दिवशी पहाटे ४ वाजता ४०० पोलीस शस्त्रांसह गाड्या घेऊन आले. आम्हाला याची कल्पना होती. त्यामुळे आम्ही हिंदूंचे संघटन केले होते. हिंदू नामजप करत होते. मोठी वाहतूकोंडी केली. हिंदूंनी आंदोलन केले. दुपारी २ वाजता युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अंततः हिंदू जिंकले. पोलिसांना परत जावे लागले. आतापर्यंत २ वेळा न्यायालयाची नोटीस आली आहे; परंतु अजूनही मंदिर हिंदूंच्या कह्यात आहे. हिंदू जेव्हा धैर्याने पुढे जातात, तेव्हा ईश्वरही त्यांच्या पाठीशी असतो, असे उद़्गार पलक्कड, केरळ येथील श्री अंजनेय सेवा समितीचे श्री. काशी विश्वनाथन् यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय सत्रात ‘मंदिरांचे उत्तम व्यवस्थापन आणि त्याद्वारे हिंदूंच्या उत्थानाचे होणारे कार्य’ या विषयावर बोलत होते.
श्री. विश्वनाथन् पुढे म्हणाले, ‘‘आमची श्री अंजनेय सेवा समिती हिंदूंसाठी पुष्कळ कार्य करते. गरीब हिंदूंना अन्नदान, विवाह, शिक्षण यांसाठी साहाय्य, तसेच वैद्यकीय साहाय्य करते. रामायणासारख्या धर्मग्रंथांचे वाटप आम्ही गेल्या २० वर्षांपासून करत आहोत. मंदिरांच्या माध्यमातून हिंदू एकत्र आले, तर हिंदु राष्ट्र नक्की येईल.’’