मुसलमानांवर अन्याय होत असल्याचे खोटे कथानक काँग्रेसने पसरवले ! – डॉ. एस्.आर्. लीला, लेखिका, बेंगळुरू, कर्नाटक
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत खोटी कथानके (नॅरेटिव्ह) पसरवून समाजामध्ये फूट पाडली जात आहे. या खोट्या कथानकांचा लोकसभा निवडणुकीवर झालेला परिणाम सर्वांनी बघितला आहे. ‘सध्या भारतात स्वातंत्र्य नाही’, हे कथानक पसरवले जाते. ‘देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले’, असे कथनाक पूर्वीपासून बनवले गेले गेले. हे पूर्णपणे चुकीचे आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर देशाची फाळणी घडवून आणली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग भारताच्या फाळणीला उत्तरदायी आहेत. त्यांनी हिंदूंच्या हत्या घडवून आणल्या. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. ‘भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे’, असे खोटे कथानक काँग्रेसने पसरवले. या खोट्या प्रचारावर प्रतिआक्रमण करणारे ‘नॅरेटिव्ह’ आपल्याला सिद्ध करावे लागेल, असे मत कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या आणि लेखिका डॉ. एस्.आर्. लीला यांनी येथे व्यक्त केले. त्या ‘हिंदुविरोधी कथानकावर प्रतिआक्रमण आवश्यक’ या विषयावर बोलत होत्या.
डॉ. लीला पुढे म्हणाल्या की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचे पुष्कळ मोठे योगदान आहे; मात्र त्यांच्या योगदानाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले आणि काँग्रेसच्या नेत्यांचा उदोउदो करणारे खोटे कथानक काँग्रेसच्या लोकांनी सर्वत्र पसरवले . ‘भारतात मुसलमान अल्पसंख्य आहेत’, असे खोटे कथानक सिद्ध केले गेले; मात्र प्रत्यक्षात मुसलमान अल्पसंख्य नाहीत. पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक मुसलमान आहेत. हिंदूंच्या मागोमाग त्यांची लोकसंख्या आहे. मुसलमान अल्पसंख्य असते, तर त्यांनी बहुसंख्य हिंदूंना आव्हान देण्याचे धाडस केले नसते. हे कथानक पूर्णपणे खोटे असून ते हाणून पाडण्यासाठी आपण मोहीम राबवली पाहिज.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘अलविदा लाल सलाम’ पुस्तकाचे प्रकाशन !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तिसर्या दिवशी झारखंडमधील रांची येथील ‘रांची सिटिजन फोरम’च्या उपाध्यक्षा डॉ. रेणुका तिवारी यांनी लिहिलेल्या ‘अलविदा लाल सलाम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या आणि लेखिका डॉ. एस्.आर्. लीला, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर उपस्थित होत्या.
शहरी नक्षलवादी हे धर्म, देश आणि संस्कृती यांच्या विरोधातील अदृष्य शत्रू ! – डॉ. रेणुका तिवारी, उपाध्यक्षा, रांची सिटीजन फोरम
शहरी नक्षलवादी आणि ख्रिस्ती प्रचारक यांची युती आहे. शहरी नक्षलवादी हे हिंदु धर्म आणि देशाचा विकास यांना विरोध करतात. त्यामुळे ते हिंदु धर्म, देश आणि संस्कृती यांच्या विरोधातील अदृष्य शत्रू आहेत. शहरी नक्षलवाद्यांनी ‘विचारवंत’ म्हणून माध्यमांमध्ये स्थान निर्माण केले आहे. सामाजिक माध्यमांवर ख्रिस्ती समर्थक ‘यू ट्यूबर’ (यू ट्यूबवर चॅनल चालवणारे) यांचा पूर आला आहे. त्यांना थांबवण्यात आपले लोक असमर्थ ठरले आहेत. त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात ‘यू ट्यूबर’ आहेत. त्या माध्यमातून ते केंद्र सरकार आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. त्यांचे हे जाळे नष्ट करण्यासाठी आपल्यालाही ‘इकोसिस्टिम’ (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु संघटनांनी गावागावांत आपली व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि शहरी नक्षलवादी देशात जे खोटे वातावरण निर्माण करत आहेत, ते उघड केले पाहिजे, असे वक्तव्य झारखंड येथील ‘रांची सिटीजन फोरम’च्या उपाध्यक्षा डॉ. रेणुका तिवारी यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या तृतीय दिवशी केले. त्या ‘झारखंडमधील शहरी नक्षलवाद’ या विषयावर बोलत होत्या.
डॉ. तिवारी म्हणाल्या, ‘‘नक्षलवाद्यांनी भारतातील १५० जिल्ह्यांतील व्यवस्था उद़्ध्वस्त केली आहे. वर्ष २०१४ मध्ये नरेंद मोदी यांचे सरकार आल्यानंतर नक्षलवाद्यांवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे प्रयत्न चालू झाले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी शहरी नक्षलवादी ही नवीन व्यवस्था निर्माण केली. त्यांच्याकडे पारंपारिक शस्त्रे नाहीत; पण त्याहून अधिक भयावह असे प्रसार, प्रचार, लेखन आणि माध्यमे यांची शस्त्रे आहेत. त्यांच्याकडे माध्यमांशी लढण्याची आणि जंगलातील नक्षलवादाला समर्थन करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांच्या योजनेनुसार ते अधिवक्ते, प्राध्यापक, महिला आणि विद्यार्थी यांना त्यांच्या जाळ्यात सहभागी करून घेण्यात यशस्वी झाले आहेत.’’
भारतावर अधिराज्य करण्यासाठी ‘गजवा-ए-हिंद’ कार्यरत ! – मोनिका रेड्डी, संस्थापक अध्यक्षा, अहम् टॉक्स, भाग्यनगर, तेलंगाणा
कुराणामध्ये ‘गजवा-ए-हिंद’चा उल्लेख नाही. ‘गजवा’चा अर्थ ‘आक्रमण’, असा आहे. इस्लाममध्येही याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख आढळत नाही. तरीही याचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ‘गजवा-ए-हिंद’चा उल्लेख हदीसमध्ये (महंमद पैगंबर यांच्या कार्याचे वर्णन करणार्या विवरणामध्ये) आढळतो. अफगाणिस्तानातून याला प्रारंभ होईल. हिंद भारत कह्यात घेण्याचा त्यांचा उद्देश आहे. अनेक इस्लामी संकेतस्थळावरून याचा प्रसार केला जात आहे. काही मुसलमान विचारवंत ‘गजवा-ए-हिंद’ला मानत नाहीत. ‘गजवा-ए-हिंद’ ही संकल्पना पाकिस्तानची निर्मिती असल्याचे सांगतात. ‘गजवा-ए-हिंद’च्या नावाने ‘जिहाद’ चालू आहे. ‘गजवा-ए-हिंद’नुसार इस्रायललाही अधिपत्याखाली आणायचे आहे. जगावर अधिराज्य करण्याचा ‘गजवा-ए-हिंद’चा उद्देश आहे. ‘गजवा-ए-हिंद’च्या माध्यमातून आतंकवादी कारवाया चालत आहेत. सद्य:स्थितीत ५० लाख घुसखोर भारतात एका उद्देशाने कार्यरत आहेत. ही चिंताजनक स्थिती आहे. ‘गजवा-ए-हिंद’चे जे भूत निर्माण करण्यात आले आहे; त्या विषयी हिंदूंनी संतर्क रहावे, असे वक्तव्य तेलंगाणा येथील अहम् टॉक्सच्या संस्थापक अध्यक्षा मोनिका रेड्डी यांनी केले. त्या ‘गजवा-ए-हिंद’पासून भारताचे रक्षण कसे होणार ?’, या विषयावर बोलत होत्या.
आपत्काळात प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणारी संपर्कयंत्रणा निर्माण करावी लागेल ! – प्रियांका लोणे, संभाजीनगर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
जगातील ५७ मुसलमान राष्ट्रांनी त्यांची संपर्कयंत्रणा विकसित केली आहे. भारतात अल्पसंख्यांकांची संपर्कयंत्रणा आहे. या संपर्कयंत्रणेमुळे मुसलमान हिंदूंना डोईजड झाले आहेत. हिंदूंनीही अशी संपर्कयंत्रणा निर्माण करायला हवी. हिंदूबहुल भागांत कट्टरतावाद्यांकडून हिंदूंच्या मिरवणुकींवर आक्रमणे होत आहेत. हिंदु धर्मावर आघात होत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंनी छोट्या-छोट्या भागांमध्ये संपर्कयंत्रणा विकसित करायला हवी. यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरातील दरवाजाच्या मागे रुग्णालये, अग्निशमनदल, स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांची संपर्कसूची असायला हवी. हिंदूंची शारीरिक, बौद्धिक, न्यायिक आणि आर्थिक ‘इकोसिस्टीम’ (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) असायला हवी. मंदिरे ही आपल्या संपर्काची केंद्रबिंदू असायला हवीत. संपर्काच्या बैठकांचे मंदिरांमध्ये आयोजन करायला हवे. हिंदूंची परंपरा शौर्याची आहे. प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणारी संपर्कयंत्रणा हिंदूंनी निर्माण करायला हवी, जी आपत्काळामध्ये हिंदूंना साहाय्य करणारी असेल. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातही ही संपर्कयंत्रणा आपणाला उपयोगी पडेल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी ‘आपत्कालीन संपर्कयंत्रणा : काळाची आवश्यकता’ या विषयावर बोलतांना केले.