पूजा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात घुसून आंदोलन करणार
देशातील एकमेव भारतमातेचे मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्त्व विभागाने पूजेस बंदी घातली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी किल्ल्यामध्ये भारतमातेचे मंदिर आहे. वर्ष १९४८ पासून अर्थात् गेल्या ७५ वर्षांपासून तिथे पूजा होत असतांना नुकताच पुरातत्त्व विभागाने पुजार्यांना एक पत्र पाठवून इथे पूजा करता येणार नाही, असा तुघलकी फतवा काढला आहे. त्याचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त एकमुखाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच तातडीने पूर्वीप्रमाणे सदर पूजा चालू करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सदर ठराव मंजूर करण्यात आला.
पूर्वीप्रमाणे तात्काळ पूजा सुरू करण्याची परवानगी न दिल्यास शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ देवगिरीतील भारतमाता मंदिरात जाऊन सामूहिक पूजा केल्यास आणि तेथे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः पोलीस आणि प्रशासन यांची असेल. अशाप्रकारे गड-किल्ल्यावर सुरू असलेली भारतमाता मंदिरातील पूजा बंद करून तमाम हिंदू गडप्रेमी, शिवप्रेमींच्या असंतोषास कारणीभूत ठरू नये अन्यथा हे सर्वजण रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
वास्तविक पहाता विभागाच्या नियमानुसार एखाद्या पुरातत्त्व वास्तूमध्ये पूर्वापार एखादी धार्मिक कृती होत असेल, तर त्याला बंदी करता येणार नाही. ताज महालमध्ये दर शुक्रवारी मुसलमान समूदाय नमाज पठण करतो. काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधलेल्या ज्ञानवापीमध्ये नमाजपठण केले जाते, तसेच मध्य प्रदेशातील भोज शाळेतील कमाल मौलाना मशिदीमध्ये नमाजपठण केले जात आहे. जर भारतमाता मंदिरात पूजा १९४८ सालापासून होत असतांना त्यावर बंदी घातली जात असेल, तर अशाच प्रकारे ताजमहल, ज्ञानवापी आणि धार येथील कमाल मौलाना मशिदीतील नमाजपठण बंद करून दाखवावे, असे आव्हान ‘वैश्विक हिंदु राष्ट्र्र महोत्सवा’च्या माध्यमांतून केंद्रीय पुरातत्त्व विभागाला देण्यात आले आहे. खरे तर भारतमातेची पूजा बंद करून पुरातत्त्व खात्याने भारताशी द्रोह केला आहे. अशा लोकांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करून देशवासियांमध्ये चांगला संदेश द्यावा, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली.