Menu Close

हिंदु राष्‍ट्राचा एकमुखाने जयघोष करत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची सांगता !

पू. अशोक पात्रीकर (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, महाराष्ट्र.), सद्‌गुरु नीलेश सिंगबाळ (धर्मप्रचारक संत, हिन्दू जनजागृति समिति), सद्‌गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिन्दू जनजागृति समिति), पू. रमानंद गौडा (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, कर्नाटक.) आणि सूत्रसंचालक श्री कार्तिक साळुंखे 2024 वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोप सत्रात घोषणा देताना
पू. अशोक पात्रीकर (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, महाराष्ट्र.), सद्‌गुरु नीलेश सिंगबाळ (धर्मप्रचारक संत, हिन्दू जनजागृति समिति), सद्‌गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिन्दू जनजागृति समिति), पू. रमानंद गौडा (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, कर्नाटक.) आणि सूत्रसंचालक श्री कार्तिक साळुंखे 2024 वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोप सत्रात घोषणा देताना

रामनाथी (गोवा) : भिन्‍न देश, भिन्‍न राज्‍ये, भिन्‍न भाषा आणि भिन्‍न वेशभूषा या विविधतेत हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या एका विचाराने हिंदुत्‍वनिष्‍ठांना संघटित करणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चा हिंदु राष्‍ट्राच्‍या जयघोषात समारोप झाला. मागील ७ दिवस हिंदु राष्‍ट्राच्‍या विचाराने प्रेरित होऊन एकत्र आलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी महोत्‍सवाच्‍या सांगता समारंभात हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी समर्पित होण्‍याचा दृढसंकल्‍प करत एकमेकांचा निरोप घेतला. या अधिवेशनामध्‍ये ६ देश आणि भारतातील २६ राज्‍यांतील १ सहस्रहून अधिक हिंदुत्‍निष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. देश- विदेशांतील अनेक संतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत हा महोत्‍सव पार पडला.
या महोत्‍सवामध्‍ये आंतरराष्‍ट्रीय स्‍तरापासून ते जिल्‍हास्‍तरापर्यंत विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांमधील अधिवक्‍ता, उद्योजक, पत्रकार, लेखक, मंदिर विश्‍वस्‍त, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. हिंदु धर्मावरील विविध आघात, मंदिर संस्‍कृतीच्‍या रक्षणाचे उपाय, वैश्‍विक स्‍तरावर हिंदुत्‍वाचे रक्षण, गड-दुर्ग यांचे रक्षण यांसह हिंदु राष्‍ट्राच्‍या पायाभरणीसाठी आवश्‍यक विषयांवर महोत्‍सवात विचारमंथन झाले, तसेच प्रत्‍यक्ष समान कृती कार्यक्रम या महोत्‍सवात निश्‍चित करण्‍यात आला. मार्गदर्शन, गटचर्चा, परिसंवाद यांद्वारे तज्ञ मान्‍यवरांनी महोत्‍सवामध्‍ये उद़्‍बोधन केले. महोत्‍सवाच्‍या शेवटच्‍या दिवशी काही हिंदुत्‍वनिष्‍ठांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर, श्री. कार्तिक साळुंखे आणि श्री. चैतन्‍य तागडे यांनी महोत्‍सवामध्‍ये सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचे आयोजक श्री. संदीप शिंदे यांनी केले. राष्‍ट्र आणि धर्म यांविषयीच्‍या ठरावांचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. संपूर्ण ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणून महोत्‍सवाची सांगता झाली. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या सौ. भक्‍ती विश्‍वनाथ कुलकर्णी आणि सौ. सायली सिद्धेश करंदीकर यांनी ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हटले.

आम्‍ही कृतज्ञ आहोत ! – हिंदु जनजागृती समिती
ईश्‍वराची कृपा, संतांचा आशीर्वाद, सच्‍चिदानंद परबह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन यांमुळे महोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडला. सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या सहकार्यामुळे महोत्‍सव पार पडल्‍याचे नमूद करत, तसेच महोत्‍सवामध्‍ये कोणती त्रुटी राहिल्‍यास त्‍याविषयी क्षमायाचना व्‍यक्‍त करून श्री. संदीप शिंदे यांनी सर्वांचे आभार व्‍यक्‍त केले. ईश्‍वर आणि संत यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव हा हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा शंखानाद ! – संदीप शिंदे
हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हे ईश्‍वराचे नियोजन आहे. आपल्‍या माध्‍यमातून ईश्‍वर हे कार्य पूर्ण करणार आहे. ‘जेथे धर्म आहे, तेथे विजय निश्‍चित आहे’, हे भगवान श्रीकृष्‍णाचे वचन लक्षात ठेवून निराशा, भय यांचा त्‍याग करून हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी कार्यरत राहूया. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव हा वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा शंखनाद आहे, असे नमूद करत श्री. संदीप शिंदे यांनी धर्मकार्य करण्‍यासाठी सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या.

१२ वे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त पारित झालेले ठराव !


१. राज्‍यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द काढून तेथे ‘आध्‍यात्‍मिक’ शब्‍द जोडून भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करावे !

२. ‘नेपाळला हिंदु राष्‍ट्र घोषित करावे’ या मागणीला पूर्ण पाठिंबा देण्‍यात आला.

३. ‘प्‍लेसेस ऑफ वर्शीप अ‍ॅक्‍ट १९९१’ तात्‍काळ रद्द करावा, तसेच काशी, मथुरा, ताजमहाल, भोजशाळा इत्‍यादी मोगल आक्रमकांनी बळकावलेली मंदिरे आणि भूमी पुन्‍हा हिंदूंच्‍या नियंत्रणात द्यावी.

४. देशभरात सरकारच्‍या नियंत्रणातील सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणांतून मुक्‍त करून भाविकांकडे द्यावीत.

५. मंदिराचा परिसर ‘मद्य-मांस’ मुक्‍त करण्‍यात यावा.

६. संपूर्ण देशात ‘गोहत्‍या बंदी’ आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे लागू करावेत.

७. धार्मिकतेवर आधारीत  ‘हलाल प्रमाणपत्रावर तात्‍काळ बंदी आणावी.

८. वक्‍फ मंडळाचा कायदा तात्‍काळ रहित करावा आणि या मंडळाने अतिक्रमण केलेली सर्व भूमी वक्‍फमुक्‍त करावी.

९. ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्‍लामीकरण) चा फतवा काढणार्‍या ‘दारुल उलूम देवबंद’ या संघटनेवर तात्‍काळ बंदी घालावी.

१०. ‘इन्‍क्‍विझिशन’च्‍या नावाखाली २५० वर्षांपासून गोमंतकियांवर झालेल्‍या अमानुष आणि क्रूर अत्‍याचाराविषयी ख्रिस्‍ती धर्मगुरू पोप यांनी गोव्‍यातील जनतेची क्षमा मागावी.

११. काश्‍मीर खोर्‍यात ‘पनून काश्‍मीर’ नावाचा केंद्रशासित प्रदेश निर्माण करून विस्‍थापित काश्‍मिरी हिंदूंचे तेथे पुनर्वसन करावे.

१२. आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भारत सरकारने पाकिस्‍तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथे हिंदूंवर झालेल्‍या अत्‍याचाराची चौकशी करून तेथील अल्‍पसंख्‍याक हिंदूंना संरक्षण द्यावे.

१३. भारतात घुसखोरी केलेल्‍या रोहिंग्‍या आणि बांगलादेशी मुसलमानांना परत पाठवण्‍यासाठी सरकारने कडक कायदा करावा. नागरिकत्‍व सुधारणा कायद्याची तातडीने कार्यवाही करावी.

१४. ‘लोकसंख्‍या नियंत्रण कायदा’ तात्‍काळ देशात लागू करावा.

१५. कर्नाटकच्‍या श्रीराम सेनेचे अध्‍यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्‍यावरील गोवा राज्‍यातील प्रवेशबंदी हटवावी.

१६. ‘ओटीटी’ आणि ‘वेब सिरीज’ कायद्याच्‍या कक्षेत आणून चित्रपट परिनिरक्षण मंडळात हिंदु आणि आध्‍यात्‍मिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करावा.

१७. ऑनलाईन माध्‍यमांतून ‘रमी सर्कल’, ‘जुगाराची विज्ञापने’ यांवर तात्‍काळ बंदी आणावी.

Related News