उज्जैन (मध्यप्रदेश) – उत्तरप्रदेशनंतर आता बिहारमधील गया, तसेच उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर येथील परिसरातील दुकानांच्या मालकांना त्यांची नावे दुकानाच्या फलकावर लिहावी लागणार आहेत. संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये असा आदेश देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
उज्जैन महानगरपालिकेने २० जुलै या दिवशी दुकान मालकांना त्यांच्या दुकानांच्या बाहेर त्यांचे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक असलेली पाटी लावण्याचे निर्देश दिले.
१. उज्जैनचे महापौर मुकेश टटवाल यांनी सांगितले की, पहिल्यांदा या आदेशाचे उल्लंघन केल्यास २ सहस्र रुपये आणि दुसर्यांदा उल्लंघन केल्यास ५ सहस्र रुपये दंड भरावा लागेल. सुरक्षा आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे, हा या आदेशाचा उद्देश आहे. उज्जैनच्या महापौर-परिषदेने २६ सप्टेंबर २००२ या दिवशीच दुकानदारांना त्यांची नावे प्रदर्शित करण्यास अनुमती देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती. नंतर तो राज्य सरकारकडे हरकती अन् औपचारिकता यांसाठी पाठवण्यात आला. आता या प्रस्तावाची कार्यवाही चालू झाली आहे. हा नियम ‘एम्पी शॉप एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ किंवा गुमास्ता परवान्यामध्ये समाविष्ट आहे. उज्जैन हे धार्मिक आणि पवित्र शहर आहे. लोक येथे धार्मिक श्रद्धेने येतात. ते ज्या दुकानदाराकडून वस्तू खरेदी करत आहेत, त्या दुकानदाराची माहिती घेण्याचा त्यांना अधिकार आहे. जर एखादा ग्राहक असमाधानी असेल किंवा त्याची फसवणूक झाली असेल, तर दुकानदाराची माहिती घेतल्यास त्याची समस्या दूर होऊ शकते.
२. इंदूरमधील भाजपचे आमदार रमेश मेंडोला यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहून संपूर्ण राज्यात हा आदेश लागू करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, नाव विचारणे, हा ग्राहकाचा अधिकार असून दुकानदारांना नाव सांगतांना लाज वाटू नये. राज्यातील दुकानांच्या बाहेर दुकानदाराचे नाव लिहिण्यात यावेे. यामुळे व्यावसायिकांची ओळख होऊ शकेल.
गयामध्ये दुकानदारांनी स्वतःहून नावांची पाटी लिहिण्यास केला प्रारंभ !
बिहारमधील गया येथील महाबोधी मंदिर परिसरातील दुकानदारांनी त्यांची नावे स्वतःहून पाट्यांवर लिहिण्यास प्रारंभ केला आहे. श्रावण मासामध्ये कावड यात्रेकरू महाबोधी मंदिरात जातात आणि भगवान शिवाला जलाभिषेक करतात. हिंदु आणि मुसलमान दुकानदारांनी स्वेच्छेने फळांच्या दुकानांसमोर स्वतःच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत. येथील काही फळ दुकानदारांनी गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या दुकानांवर स्वतःची नावे लिहिलेली आहेत. त्याचा व्यवसायावर परिणाम होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बिहारमधील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल म्हणाले की, उत्तरप्रदेशसारखा निर्णय येथे लागू झाला, तर सर्व भांडणे संपुष्टात येतील. प्रवासी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आवडीच्या दुकानात जातील. यामुळे पुढे होणार्या वादातून सुटका होईल. कावड यात्रेकरूंची त्रासातून सुटका होईल.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात