मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती मिशनरी अशा प्रकारचे धाडस करतातच कसे ? अशा प्रकारे हिंदूंची धार्मिक पुस्तके मिशनरी शाळांमध्ये वाटप करण्याचा हिंदु संघटनांनी प्रयत्न केला असता, तर एव्हाना देशात ढोंगी निधर्मीवाद्यांनी आकांडतांडव केला असता ! -संपादक
विदिशा (मध्यप्रदेश) – येथे ख्रिस्ती मिशनरी सक्रीय आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली मिशनर्यांशी संबंधित लोक येशू ख्रिस्ताच्या कथांशी संबंधित धार्मिक पुस्तकांचे वाटप करत आहेत. या पुस्तकांची नावेही हिंदूंच्या धर्मग्रंथांप्रमाणे आहेत, तर आतील कथा येशूच्या गौरवाने भरलेल्या आहेत. ही प्रकरणे लोकांना थेट धर्मांतर करण्यास प्रवृत्त करतात. येथील लिरा भागात १९ जुलै या दिवशी एक तरुणी ‘पांडोचा मिडल स्कूल’मध्ये पोचली आणि तिने स्वत:ला एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित असल्याचा दावा केला. त्यानंतर तिने शाळेतील मुलांना येशूच्या गौरवाशी संबंधित पुस्तके विनामूल्य वाटण्यास प्रारंभ केला. ‘पवित्र ग्रंथ, स्तोत्रे आणि नीतीशास्त्र’ असे या पुस्तकाचे नाव होते. या पुस्तकाच्या नावावरून हे पुस्तक हिंदु धर्माविषयी असेल, असा भ्रम होतो; पण प्रत्यक्षात हे पुस्तक येशू ख्रिस्ताच्या चमत्कारिक कथांनी भरलेले होते. एवढेच नाही, तर ख्रिस्ती धर्माचे गुणगान करतांना या पुस्तकात हिंदूंच्या संतांची निंदा केली होती. या तरुणीला पुस्तके वाटप करण्यास शिक्षकांनी विरोध केला असता तिने शिक्षकांशी हाणामारी केली. पोलिसांना बोलावण्याची चर्चा होताच ती पळून गेली.
१. या तरुणीने ती भाग्यनगर येथून आल्याचे सांगितले. अनेक वेळा विचारल्यावरही तिने तिचे नाव सांगितले नाही. तिने एवढेच सांगितले की, ती एका स्वयंसेवी संस्थेसाठी पुस्तके वाटण्याचे काम विनामूल्य करते. ती अन्य २ महिलांसमवेत बीना येथून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या महिलांनीही अशी पुस्तके वेगवेगळ्या गावांत वाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
२. ही घटना घडलेल्या शाळेतील संजय लोधी नावाच्या शिक्षकांनी या तरुणीला थांबवले होते. स्थानिक प्रसारमाध्यमांना संजय लोधी यांनी सांगितले की, ही तरुणी जवळपासच्या गावातही विनामूल्य पुस्तके वितरित करत होती आणि गरीब अन् अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकाधिक घरांमध्ये पुस्तक पोचवण्याचा प्रयत्न करत होती. तिने सागर आणि इटारसी येथेही पुस्तकांचे वाटप केल्याचा दावा केला आहे.
३. या प्रकरणी बजरंग दलाचे सहसंयोजक रवि लोधी आणि संघटनेचे इतर अधिकारी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा शिक्षकाने व्हिडिओही बनवला असून तो सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात