Menu Close

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांची पंढरपूर येथे ‘राज्यस्तरीय वारकरी बैठक’

पुरोगामी आणि धर्मविरोधी यांच्याकडून धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी वारकर्‍यांची ‘इकोसिस्टीम’ तयार करण्याचा निर्णय!

पंढरीच्या वारीच्या कालावधीत दिंड्यांमध्ये घुसून ‘वारकरी म्हणजे शांत, संयमी, तर हनुमान जयंती, श्रीरामनवमीच्या मिरवणुकांच्या काळात हिंदू, हिंदू संघटना दंगली घडवत आहेत’, असे ‘नॅरेटीव्ह’ निर्माण केले जात आहेत. यात ‘वारकरी विरुद्ध हिंदू’, असे फितवले जात आहे. बुद्धीभेद केला जात आहे. असे करून हिंदूंविरुद्ध हिंदू संघर्ष निर्माण केला जात आहेत. यासाठी काही कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक वारीत येऊन बायबल वाटत आहेत, पुरोगामी विचारसरणीचे लोक येऊन दिशाभूल करत आहेत. तरी पुरोगामी आणि धर्मविरोधी लोकांकडून पद्धतशीरपणे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी वारकर्‍यांची ‘इकोसिस्टीम’ तयार करण्याचा एकमताने निर्णय ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘राष्ट्रीय वारकरी परिषद’ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पंढरपूर येथे झालेल्या ‘राज्यस्तरीय वारकरी बैठकी’त घेण्यात आला.

येथील ब्रह्मीभूत श्री बालयोगी महाराज यांच्या मठामध्ये झालेल्या या बैठकीस वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुती महाराज तुनतुणे, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे श्री. गणेश लंके, ह.भ.प. (अधिवक्ता) आशुतोष महाराज बडवे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह महाराष्ट्रातील ३९ ह.भ.प., कीर्तनकार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी ह.भ.प. नरहरी चौधरी महाराज म्हणाले, ‘‘कीर्तन हे मौज आणि करमणुकीसाठी अलीकडे केले जाते; परंतु सप्ताहाची रूपरेषाही अशा पद्धतीने केली आहे की त्यातून भगवत्प्राप्ती व्हावी. संत जनाबाई, संत मुक्ताबाई या साधना करून संत झाल्या. त्यामुळे ‘साधनेतून संतत्व प्राप्त होते’ हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. कीर्तन हे मनोरंजनाचे साधन व्हायला नको.’’ ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे महाराज म्हणाले, ‘‘आता परिस्थिती अशी आली आहे की सर्वांनी संघटित होऊन लढायला हवे, तर आणि तरच हिंदू आणि वारकरी परंपरा धर्मपरंपरा यांचे रक्षण होऊ शकते. यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत संघटित प्रयत्न करायचे आहेत.’’ ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, ‘‘या वेळी श्रीक्षेत्र देहू येथे तेथील देवस्थानने त्यांच्या परिसरात असलेल्या १ किलोमीटर परिसरामध्ये मद्य आणि मांस यांची विक्री होणार नाही, असे सर्व जनतेला आवाहन केल्यावर त्या परिसरातील सर्वच दुकाने इतरत्र हलवली गेली. जर देहूला होते, तर श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूर येथे का होऊ शकत नाही ?’’

या परिषदेत सर्व तीर्थक्षेत्र मद्य-मांस मुक्त व्हावीत, तसेच तीर्थक्षेत्रांच्या परिसरात ५०० मीटर अंतरापर्यंत मद्य-मांस मुक्त असावीत, संत, संत वाड्मय, हिंदु धर्मग्रंथ, हिंदु देवी-देवता यांवर होत असलेल्या अवमानाच्या विरोधात विशेष कायदा करावा, मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील संत कान्होपात्रा यांच्या जन्मस्थानावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ दूर करण्यात यावे आणि ते पवित्र भूमी म्हणून आरक्षित करून वारकर्‍यांच्या नियंत्रणात द्यावे, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री बालाजी देवस्थानच्या धर्तीवर सशुल्क दर्शनाचे टोकन देण्याच्या संदर्भात घेण्यात येणार्‍या निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे यांसह अन्य ठराव एकमताने या वेळी संमत करण्यात आले.

Related News