कोल्हापूर (महाराष्ट्र)– आपण धर्मपालन केले पाहिजे आणि सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक महिलेने घरातील लहान मुलांवर संस्कार करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी मुलांना शिवमहिन्म स्तोत्र, श्री सूक्त, अथर्वशीर्ष शिकवल्यास प्रत्येक घरात उन्नती पहायला मिळेल, असे मार्गदर्शन गुरुवर्य ष.ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांनी केले. ते विश्वपंढरी सभागृह येथे ‘कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्थे’च्या वतीने आयोजित संस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलत होते. संस्थेच्या वतीने गेली १० वर्षे हा उपक्रम चालू आहे.
या प्रसंगी गुरुवर्य ष.ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य वाळवेकर महाराज आणि ष.ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळाचे कार्याध्यक्ष श्री संतोष जंगम-स्वामी यांनी प्रास्ताविक केले, तसेच मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने अथर्वशीर्ष, श्री सूक्त, शिवमहिन्म स्तोत्र याचे २०८ महिलांनी पठण केले. या प्रसंगी उद्योगपती नितीन जंगम, उत्तम जंगम, मंडळाचे अध्यक्ष दयानंद जंगम, जगदीश गोळवणे, अविनाश कुंभार, दीपक जंगम, प्रसाद स्वामी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीकडून गुरुवर्य ष.ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांना ग्रंथ भेट दिला !