Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यामध्ये ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी (लखनौ), प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

आपल्या आचरणातून संस्कृतीचे रक्षण आणि धर्मपालन करूया ! – सद्गुरु नीलेश आणिगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – आध्यात्मिक साधना केल्याने आपली ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगती होते. वैयक्तिक जीवनात रामराज्य प्राप्त करतांनाच आपल्याला सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातही रामराज्य प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासह भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांविरुद्ध लढावे लागेल, तसेच आपल्या आचरणातून संस्कृतीचे रक्षण अन् धर्मपालन करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. वाराणसीमधील शिवपूर येथील संत अतुलानंद कॉन्व्हेंट शाळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी काशीविश्वनाथ मंदिराच्या संघर्षाविषयी आलेले अनुभव कथन केले.

या महोत्सवात भारत सेवा संघ आश्रमाचे पू. स्वामी ब्रह्मयानंद महाराज, संत अतुलानंद कॉन्व्हेंट शाळेचे संचालक तथा सेवा भारती समितीचे अध्यक्ष श्री. राहुल सिंह, ज्ञानवापीचे हिंदु पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य, ज्ञानवापीचे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी, मां शृंगार गौरी मंदिर प्रकरणातील याचिकाकर्त्या लक्ष्मी आर्य आणि सीता साहू, मानस प्रचार सेवा समितीचे अध्यक्ष श्री. रविशंकर सिंह, वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा, मां अष्टभुजा सेवा समितीचे अध्यक्ष श्री. मुरारीलाल गुप्ता, अखिल भारतीय सनातन समितीचे अध्यक्ष अधिवक्ता दीपक सिंह, राष्ट्रीय मानवाधिकार तथा न्याय परिषदेचे महासचिव अधिवक्ता अरुणकुमार मौर्य, डॉ. अजयकुमार जयस्वाल, चमाव गावाचे माजी प्रधान श्री. जयप्रकाश सिंह यांच्यासह २१३ जिज्ञासू उपस्थित होते.

क्षणचित्र

संत अतुलानंद कॉन्व्हेंटचे मुख्य संचालक श्री. राहुल सिंह यांनी गुरुपौर्णिमेच्या सिद्धतेसाठी सभागृह उपलब्ध व्हावे, यासाठी नियमित शाळा बंद ठेवली. त्या दिवशी त्यांनी पालक सभा ठेवली आणि दुपारी १ वाजता शाळा उपलब्ध करून दिली.


नटवा (वाराणसी) गावातील शिवपुरी वाटिका येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

नटवा – वाराणसीमधील नटवा गावातील ‘शिवपुरी वाटिका’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या गुरुपौर्णिमेला समितीच्या सौ. रिता पाठक यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी १२७ जिज्ञासू उपस्थित होते. शिवपुरी वाटिकेच्या मालकांचे भाऊ श्री. भाई राधेश्याम अग्रहरी यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थेचे कौतुक केले. या वेळी त्यांनी ‘वाटिकेमध्ये असलेली कोणतीही वस्तू विनामूल्य वापरू शकता’, असे सांगितले. शिवपुरी वाटिकेचे मालक श्री. सीताराम अग्रहरी यांना कार्यक्रम आवडला. त्यांनी ‘साधकांना काही गैरसोय झाली नाही ना ?’, असे आवर्जून विचारले.


लक्ष्मणपुरी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाला २०० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती !

लक्ष्मणपुरी – येथील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा २०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन, प्रसारासाठी आलेल्या साधकांची निवास अन् भोजन व्यवस्था आदी विविध गोष्टींचे दायित्व लक्ष्मणपुरीचे डॉ. शुभम शुक्ला आणि श्री. कमलेश गुप्ता यांनी स्वीकारले होते.

२. गोरखपूर येथील धर्मप्रेमी श्री. धीरेंद्र पांडे हे १० घंटे प्रवास करून गुरुपौर्णिमेची सेवा करण्यासाठी आले होते.

३. कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत अनुमाने २५ हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी संघटितपणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला.


सैदपूर येथील गुरुपौर्णिमेला १७० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती !

गाझीपूर – सैदपूर येथील कौशिक उपवन मॅरेज हॉलमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे श्री. राजन केसरी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला १७० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. अधिवक्ता जितेंद्र सिंह यांनी कोणत्याही प्रकारचे साहाय्य देण्याची सिद्धता दर्शवली. ते म्हणाले, ‘‘मीही २५ वर्षांपासून एका हिंदु संघटनेत कार्यरत आहे; पण समितीच्या साधकांचा त्याग, संस्कार, पोशाख आणि बोलण्याची शैली मला पुष्कळ भावली. ते हे कार्य धर्माला डोळ्यासमोर ठेवून करत आहेत. यातूनच परिवर्तन घडते.’’ या वेळी त्यांनी समितीच्या साधकांना सैदपूर येथे धर्मप्रसार करण्याची विनंती केली.

२. धर्मप्रेमी श्री. गोपाल पांडे यांनी सभागृहाचे आरक्षण, मंडप अन् विद्युत् जनित्र यांची व्यवस्था करणे, गुरुपौर्णिमेची माहिती देणारे फ्लेक्स प्रायोजित करणे, निमंत्रण देणे, अशा विविध सेवांचे दायित्व स्वीकारले.


भदोही येथील गुरुपौर्णिमेचा १९० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

भदोही – येथील सेलिब्रेशन पॅलेस येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाचा १९० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

क्षणचित्र

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्याला नियमित सहकार्य करणारे डॉ.बी.एस्. मौर्य, श्री. स्वतंत्र बरनवाल, श्री. जितेंद्र माळी आणि श्री. विवेक गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. या सर्वांनी ‘समितीचे काम अतिशय चांगले आहे. अशा प्रकारे निःस्वार्थपणे कार्य करूनच आपण आपला धर्म वाचवू शकतो आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो’, असे सांगितले.


प्रयागराज येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

प्रयागराज – प्रयागराजमधील हिंदुस्थानी अकादमी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथील हिंदुत्वनिष्ठ आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अवधेश राय यांनी उपस्थित जिज्ञासूंना संबोधित केले. त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शिष्य घडवून हिंदु साम्राज्याची स्थापना करणारे समर्थ रामदासस्वामी यांनी कसे कार्य केले’, याविषयी उपस्थितांना सांगितले. या वेळी त्यांनी हिंदूंवर होत असलेल्या विविध आक्रमणांची माहिती दिली आणि हिंदूंना सतर्क रहाण्यासह संघटित होण्याचे आवाहन केले.

या वेळी समितीचे श्री. गुरुराज प्रभु यांनी उपस्थितांना संबोधित केले. या गुरुपौर्णिमेला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Related News