इस्लामी देशांतील हिंदूंची स्थिती ! याविषयी जगातील एकही इस्लामी देश हिंदूंच्या बाजूने बोलत नाही, हे लक्षात घ्या ! -संपादक
नवी देहली – बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरतावाद्यांच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेले अराजक तेथील हिंदु समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. मुळातच बांगलादेशात भेदभाव आणि अत्याचार यांचा सामना करत असलेल्या हिंदूंची लोकसंख्या सातत्याने न्यून होत आहे. वर्ष १९५१ च्या तुलनेत आज बांगलादेशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये हिंदूंचा वाटा १४ टक्क्यांनी अल्प झाला आहे. प्रतिवर्षी बांगलादेशातील २ लाख ३० सहस्र हिंदूंना देश सोडण्यास भाग पाडले जाते.
१. बांगलादेशामध्ये ‘वेस्टेड प्रॉपर्टी अॅक्ट’च्या (शत्रू मालमत्ता कायदाच्या) अंतर्गत वर्ष १९६५ ते २००६ या काळात हिंदूंच्या मालकीची सुमारे २६ लाख एकर भूमी कह्यात घेण्यात आली. याचा फटका १२ लाख हिंदु कुटुंबांना बसला.
२. वर्ष १९८० ते १९९० या काळात हिंदूंच्या विरोधात कट्टरतावादी चळवळी मोठ्या प्रमाणात वाढल्या. वर्ष १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्यानंतर चितगाव आणि ढाका येथे अनेक हिंदु मंदिरांना आग लावण्यात आली होती.
३. बांगलादेश मुक्ती युद्धाच्या काळात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले; कारण अनेक पाकिस्तानी त्यांना फुटीरतेसाठी दोषी मानत होते. वर्ष १९५१ च्या अधिकृत जनगणनेनुसार बांगलादेशाच्या (तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या) एकूण लोकसंख्येच्या २२ टक्के हिंदू होते. वर्ष १९९१ पर्यंत ही संख्या १५ टक्क्यांंवर घसरली. वर्ष २०११ च्या जनगणनेत ही संख्या केवळ ८.५ टक्क्यांवर आली. वर्ष २०२२ मध्ये ते ८ टक्क्यांपेक्षा अल्प झाले आहे. त्याच वेळी मुसलमानांनी लोकसंख्या वर्ष १९५१ मध्ये असलेल्या ७६ टक्क्यांवरून वर्ष २०२२ मध्ये ९१ टक्क्यांहून अधिक झाली आहे.
४. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या अहवालानुसार वर्ष १९६४ ते २०१३ या काळात धार्मिक छळामुळे १ कोटी १० लाखांहून अधिक हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केले. वर्ष २०११ च्या जनगणनेत वर्ष २००० ते २०१० या काळात देशाच्या लोकसंख्येतून १० लाख हिंदू गायब झाल्याचे उघड झाले.
५. बांगलादेशात जानेवारी ते जून २०१६ या काळात हिंदूंना लक्ष्य करणार्या हिंसाचारात ६६ घरे जाळली गेली, २४ लोक घायाळ झाले आणि किमान ४९ मंदिरे नष्ट झाली.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात