Menu Close

गोवर्धन (उत्तरप्रदेश) येथे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यथाशीघ्र भारत हिंदु राष्ट्र बनण्यासाठी पार पडला ७ दिवसांचा ‘जनशांती धर्म समारोह’

गोवर्धन (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीकृष्णाने लीला करत स्वतःच्या करंगळीने उचललेल्या पवित्र गोवर्धन पर्वताच्या सान्निध्यामध्ये निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने ‘जनशांती धर्म समारोह’ आयोजित करण्यात आला होता. हा समारोह २५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीमध्ये श्री रमणरेती आश्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या ७ दिवसांमध्ये महाजप अनुष्ठान, अखंड नंदादीप, यज्ञ, हस्तलिखित जपसाधना, अभिषेक, अशा विविध उपक्रमांमध्ये सहस्रो भक्त सहभागी झाले. समारोहाची सांगता १ ऑगस्टला यज्ञाच्या पूर्णाहुतीने झाल्यानंतर श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी मौन सोडले. या वेळी ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक तथा महाराजांचे भक्त श्री. सुरेश चव्हाणके, ‘चाणक्य न्यूज’चे श्री. अजय शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. या समारोहामध्ये सहस्रो साधकांनी मौन साधना, ११ कोटी जप, ५१ सहस्र विधीपाठ तथा ५ सहस्र घंट्यांचे श्रमदान या सर्व साधनेचे पुण्यफळ ‘भारत लवकरच हिंदु राष्ट्र बनावा’, यासाठी अर्पित केले. या समारोहाला महाराष्ट्रातून अनेक भक्त सहकुटुंब उपस्थित होते. या कार्यात युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मचारी रामानंद यांनी केले.

श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना ग्रंथ भेट देतांना सदगुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (डावीकडे)

विश्वशांतीचा मार्ग सनातन धर्माच्या अनुकरणामध्ये आहे ! – सदगुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्माचरण करणे आणि धर्माच्या मार्गाने चालणे, हे शांतीसाठी पहिले पाऊल आहे. जपसाधना ही केवळ मनःशांतीसाठी नव्हे, तर ती स्वतःची आध्यात्मिक शक्ती आणि सामर्थ्य यांचेही प्रतीक आहे. आपला इतिहास सांगतो की, श्रीराम-रावण युद्धानंतर शांतीची, म्हणजेच रामराज्याची स्थापना झाली. राम जन्मानंतर शांती स्थापित झाली नाही, तर सीताहरण झाल्यावर जे भीषण युद्ध झाले, त्यानंतर शांतीची स्थापना झाली, तसेच श्रीकृष्ण जन्मानंतर शांतीची अथवा धर्म राज्याची स्थापना झाली नाही. कंसाचा वध आणि अधर्मी कौरव यांच्या निर्दालनानंतर धर्माची स्थापना झाली.  आज आपल्या देशामध्ये खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली लोकशाहीची व्याख्याच पालटण्यात आली आहे. आजच्या लोकशाहीत बहुमताचा (बहुसंख्यांकांचा) विचार आणि त्यांचे अधिकार नाकारून अल्पसंख्यांकांना सर्व अधिकार दिले जात आहेत, हे दुर्भाग्य आहे. समानतेचे मूलतत्त्व म्हणून जे अधिकार अल्पसंख्यांकांना दिले आहेत ते आम्हा हिंदूंनाही मिळावेत; म्हणून आज हिंदूंवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. जर आपल्याला धर्माचे रक्षण करायचे आहे, तर आपण संख्येने कितीही अल्प असलो, तर धर्माचरण करत दुष्प्रवृत्तींचे निर्दालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा आध्यात्मिक समारोह आणि नामजप साधना यांतून जे बळ निर्माण होत आहे, ते निश्चित आपल्याला हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ अन् आशीर्वाद देणारे आहे. केवळ भारतामध्ये हिंदु राष्ट्र नव्हे, तर विश्वशांतीचा मार्ग सनातन धर्माच्या अनुकरणामध्ये आहे.


आज छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता ! – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

श्री. सुरेश चव्हाणके

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ भारतात नव्हे, तर अखिल विश्वामध्ये ‘पराक्रमी योद्धा राजा’ म्हणून आजही घेतले जाते. महाराष्ट्र ही संत आणि पराक्रमी राजा यांची भूमी आहे; पण आज महाराष्ट्रालाच वाचवण्याची वेळ आली आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये महाराष्ट्राचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे. सध्या चालू असलेले वर्ष हे शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. आज आपण केवळ एक दिवस शिवजयंती साजरी करून अथवा छत्रपती शिवरायांसारखा पेहराव करून त्यांचे गुण, शौर्य आपल्यामध्ये येणार नाहीत. त्यासाठी आपण आपले आचरण महाराजांसारखे केले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी लहानपणीच ‘हिंदवी स्वराज्याचे’ मोठे अन् व्यापक ध्येय ठेवले आणि त्यासाठी संघटन केले, प्राणपणाला लावले. आज हा इतिहास पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

Related News