चर्चेनंतर विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले !
नवी देहली – लोकसभेत ८ ऑगस्ट या दिवशी वक्फ बोर्डाशी संबंधित सुधारणा करणारे विधेयक सादर करण्यात आले. अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले. यावर दिवसभरात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी त्यांची मते मांडली. या वेळी काही वेळ गदारोळही झाला. यानंतर शेवटी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव स्वतः रिजिजू यांनी मांडला. या वेळी लोकसभा अध्यक्षांनी ‘लवकर समिती स्थापन करू’, असे सांगितले.
सकाळी रिजिजू यांनी विधेयक लोकसभेत मांडल्यावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी ‘राज्यघटनेने लोकांना दिलेल्या धर्म आणि मूलभूत हक्क यांंवर हे थेट आक्रमण आहे’, असा आरोप केला. यानंतर द्रमुकच्या कनिमोळी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे आदींनी याला विधेकावर बोलतांना त्याला विरोध केला. नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) यांच्या खासदाराने विधेयकाचे समर्थन केले. तसेच शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही याचे समर्थन केले. यानंतर किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या टीकेवर उत्तर देऊन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची अध्यक्षांना विनंती केली.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात