पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कायद्याचा दिला संदर्भ !
जबलपूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील काही प्रमुख ऐतिहासिक वास्तूंच्या मालकीवर दावा करणारा मध्यप्रदेश वक्फ बोर्डाचा आदेश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळला. मध्यप्रदेश वक्फ बोर्डाने १९ जुलै २०१३ या दिवशी दिलेल्या आदेशात शाह शुजाची कबर (थडगे), नादिर शाहची कबर, बीबी साहिब मशीद आणि बुरहानपूर किल्ल्यातील एक राजवाडा यांना बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित केले होते.
पुरातत्व सर्वेक्षण विभाग या स्मारकांचे संरक्षण करत असून ती केंद्र सरकारची मालमत्ता असल्याचे कारण देत या विभागाने या आदेशाला आव्हान दिले होते. सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती जी.एस्. अहलुवालिया यांनी सांगितले की, ही मालमत्ता एक प्राचीन आणि संरक्षित स्मारक आहे, जी प्राचीन स्मारकांचे संरक्षण कायदा, १९०४ अंतर्गत विधिवत अधिसूचित केलेली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकार्याचा याचिकाकर्त्याला मालमत्ता रिकामी करण्याचा निर्देश अवैध आहे. यामुळे मध्यप्रदेश वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याने दिलेला १९ जुलै २०१३ चा आदेश रहित करण्यात येत आहे. देशभरात विविध ठिकाणी याचिकाकर्त्याच्या (पुरातत्व विभागाच्या) संरक्षणाखाली अनेक प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आहेत, जी भारताच्या प्राचीन इतिहासाचा अद़्भुत वारसा आहेत. शाह शुजाची कबर, नादिरशाहची कबर, बुरहानपूर किल्ल्यातील बीबी साहिब मशीद, ही प्राचीन आणि संरक्षित स्मारके आहेत.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात