Menu Close

ढाका (बांगलादेश) येथे हिंदु संघटनेकडून हिंदूंवरील आक्रमणाच्‍या विरोधात निदर्शने

‘हरे कृष्‍णा-हरे रामा’चा जयघोष !

बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्‍त्‍यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्‍यांनी इतक्‍यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्‍वसंरक्षण शिकवणे आवश्‍यक आहे ! -संपादक 

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात गेल्‍या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्‍यामध्‍ये काही प्रमाणात थांबला. त्‍यानंतर हिंदूंच्‍या विरोधातील अत्‍याचारांच्‍या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने ढाक्‍याच्‍या शाहबाग चौकात निदर्शने केली. ‘ढाका ट्रिब्‍युन’ या बंगाली वृत्तपत्रानुसार सहस्रो हिंदू शाहबाग चौकात जमले आणि त्‍यांनी हिंसाचाराच्‍या विरोधात आवाज उठवला. या वेळी त्‍यांनी ‘हरे कृष्‍णा-हरे रामा’चा जयघोष केला.

हिंदु जागरण मंचाच्‍या आयोजकांनी सांगितले की, दिनाजपूरमध्‍ये ४ हिंदूबहुल गावे जाळण्‍यात आली. लोक निराधार झाले आहेत. अत्‍याचारांच्‍या भीतीने ते लपून बसले आहेत. शेख हसीना यांनी देश सोडल्‍यापासून बांगलादेशामध्‍ये हिंदूंवरील आक्रमणे वाढली आहेत. अशी आक्रमणे रोखण्‍यासाठी अल्‍पसंख्‍यांक मंत्रालयाची स्‍थापना, अल्‍पसंख्‍यांक संरक्षण आयोगाची स्‍थापना, तसेच कठोर कायदे करण्‍याची आणि संसदेत अल्‍पसंख्‍यांकांसाठी १० टक्‍के जागा राखीव ठेवण्‍याची आम्‍ही मागणी केली आहे. तसेच हिंसाचारात हानी झालेल्‍यांना भरपाई द्यावी, मोडकळीस आलेली मंदिरे पुन्‍हा बांधून द्यावीत, अशीही मागणी केली आहे.

आंदोलक म्‍हणाले की, ही आमच्‍या पूर्वजांची भूमी आहे. आम्‍ही इथे मारले गेलो, तरी आम्‍ही आमची जन्‍मभूमी बांगलादेश सोडणार नाही. हक्‍क मिळवण्‍यासाठी आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरणार.

५२ जिल्‍ह्यांत हिंदूंवर आक्रमणे झाली !

बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्‍चन एकता परिषदेनुसार देशातील ६४ पैकी ५२ जिल्‍ह्यांमध्‍ये हिंदू आणि त्‍यांची मालमत्ता यांना लक्ष्य करण्‍यात आले. अल्‍पसंख्‍यांकांना भीतीच्‍या वातावरणात जगावे लागत असल्‍याचे परिषदेने म्‍हटले आहे. त्‍यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्‍याकडे सुरक्षा आणि संरक्षण यांची मागणी केली आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News