-
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या मागण्या !
-
जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
जळगाव (महाराष्ट्र) : वर्ष १९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदू मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आज तोच प्रकार चालू आहे. विद्यार्थी आंदोलन हा मुखवटा आहे. खरेतर या आंदोलनाच्या आडून हे जिहाद्यांचेच षड्यंत्र आहे. बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारताने आग्रही भूमिका घ्यावी. विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत आणि यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करावा, अशा विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बसस्थानक येथे १० ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदानाजवळ मूक निदर्शने करण्यात आली.
या वेळी धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ४०० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी देऊन आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना, तर धरणगाव येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी ‘बांगलादेशातील हिंदूंना न्याय द्या’, ‘मुक्त झाला प्रतापगड; आता वाट पहातोय विशाळगड !’, ‘विशाळगड प्रकरणी शिवभक्तांवर केलेली कारवाई मागे घ्या’, ‘लाडक्या बहिणीचे रक्षण करा; लव्ह जिहादविरोधी कायदा करा’, असे जागृतीपर फलक धरण्यात आले होते.