Menu Close

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – बापू ठाणगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने अहिल्यानगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

आंदोलनात सहभागी हिंदु धर्मप्रेमी

अहिल्यानगर (महाराष्ट्र) – बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी, तेथील मंदिरांच्या रक्षणासाठी तेथील सैन्यदलाला भारत सरकारने कठोर सूचना द्याव्यात. तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात यावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी श्री. बापू ठाणगे यांनी केली. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी येथील वीर सावरकर चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गोसेवा समिती, हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्र निर्माण सेना, पतितपावन संघटना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

भारत सरकारने हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्रां’मध्ये मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, तर त्यांना आश्रय देण्यात यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली

अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन

१. ‘राष्ट्र निर्माण पार्टी’चे उत्कर्ष गीते यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी त्यांना भारतात आणावे किंवा आपली सैन्य तुकडी बांगलादेशात पाठवून त्यांचे संरक्षण करावे, अशी मागणी या वेळी केली.

२. भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सुरेखा विद्दे म्हणाल्या की, सर्व हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. हिंदूंवर होणारा अन्याय म्हणजे देशावर होणारा अन्याय आहे.

३. ‘प्रत्येक हिंदूचे संरक्षण करणे, हे सर्व हिंदूंचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वानी संघटित होऊन आपल्या बांधवांवर होणार्‍या आक्रमणाचा आपापल्या परीने निषेध करणे आवश्यक आहे’, असे मत ह.भ.प रामदास महाराज क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

Related News