‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.’ आस्थापनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन !
पुणे (महाराष्ट्र) – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निधर्मी राष्ट्र घोषित केल्यामुळे देहातून प्राण निघून गेल्यानंतर शरिराची जी स्थिती होते, तशी स्थिती आज निर्माण झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे ते धर्माचरण करत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्माभिमान उरलेला नाही. त्यामुळे ते पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत आहेत. आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने, समस्या आहेत. या सर्वांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य !, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी काढले. कोथरूड येथील ‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि.’ आस्थापनाच्या वतीने भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १४ ऑगस्ट या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कु. क्रांती पेटकर यांनी ‘राष्ट्र आणि धर्मासमोरील विविध आव्हाने अन् त्यासाठी रामराज्याची आवश्यकता’ या विषयावर बोलल्या.
या वेळी आस्थापनाचे कर्मचारी आणि इतर मान्यवर असे १६५ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. सर्वांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा विषय आस्थापनातील सर्व कर्मचार्यांपर्यंत पोचावा, अशी कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि. आस्थापनाच्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी यांची पुष्कळ तळमळ होती. त्यासाठी त्यांनी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश कुलकर्णी यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनापासून कार्यक्रमाच्या समारोपापर्यंतचे सर्व नियोजन अतिशय उत्तम केले होते. यामध्ये प्रामुख्याने समितीचा फलक लावणे, फुलांच्या माळा लावणे, सभागृह सजावट करणे इत्यादी सर्व त्यांनीच पुढाकाराने केले. कार्यक्रमाचा आरंभ राष्ट्रगीत म्हणून आणि समारोप ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आला. काही कर्मचार्यांनी देशभक्तीपर गीत म्हटले. या वेळी सौ. मृणाल आणि श्री. राजेश कुलकर्णी यांच्या वतीने आस्थापनातील कर्मचार्यांना ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.
वैशिष्टयपूर्ण
१. व्याख्यान झाल्यानंतर उपस्थित जिज्ञासूंपैकी काही जणांनी, तसेच कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि. कंपनीच्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी यांनी स्वतःही यापुढे इतरही विषयांवरील व्याख्यान पुन्हा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
२. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.