Menu Close

अजमेर येथील १९९२ मधील लैंगिक शोषण प्रकरण : ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड

इतक्या गंभीर प्रकरणांचा ३२ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नव्हे, तर अन्यायच ! -संपादक 

(डावीकडून) सय्यद जमीर हुसेन, सोहिल गनी, सलीम चिश्ती, नफीस चिश्ती आणि नसीम उपाख्य टारझन

अजमेर (राजस्थान) – येथे वर्ष १९९२ मध्ये, म्हणजे ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नफीस चिश्ती, नसीम उपाख्य टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहिल गनी आणि सय्यद जमीर हुसेन, अशी त्यांची नावे आहेत. शिक्षा सुनावण्यात आली, त्या वेळी सर्व दोषी न्यायालयात उपस्थित होते. या दोषींवर २३ जून २००१ या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी जुलै २०२४ मध्ये सुनावणी पूर्ण झाली. (वर्ष १९९२ च्या प्रकरणाचे आरोपपत्र ९ वर्षांनी प्रविष्ट होते आणि सुनावणी वर्ष २०२४ मध्ये पूर्ण होते, हे भारतीय व्यवस्थांना लज्जास्पद ! – संपादक)

वर्ष १९९२ मध्ये १०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थिंनींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची नग्न छायाचित्रे प्रसारित झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात १८ आरोपी होते. ४ जणांना यापूर्वी शिक्षा झाली आहे, तसेच ४ जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ३० वर्षांपूर्वी एका आरोपीने आत्महत्या केली होती. २ आरोपींविरुद्ध मुलाचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांपैकी एकाला शिक्षा झाली असून दुसर्‍याविरुद्ध खटला चालू आहे.

दोषी गुन्हेगार काँग्रेसचे तत्कालीन पदाधिकारी !

या गुन्ह्याचे सूत्रधार अजमेर युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष फारुख चिश्ती, नफीस चिश्ती (तत्कालीन युवक काँग्रेसचे सहसचिव), अन्वर चिश्ती (तत्कालीन युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष) आणि इतर आरोपींनी एका व्यावसायिकाच्या मुलाशी मैत्री केली होती. त्याच्यावर बलात्कार करून त्याची छायाचित्रे काढली होती. त्याला ब्लॅकमेल केल्यानंतर त्यांनी त्याच्या मैत्रिणीला ‘पोल्ट्री फार्म’मध्ये आणून तिच्यावर बलात्कार केला. तिची नग्न छायाचित्रे काढली होती. तिलाही तिच्या मैत्रिणींना त्यांच्याकडे आणण्यास भाग पाडले. यानंतर त्याने एकामागून एक अनेक मुलींवर बलात्कार करून त्या मुलींची नग्न छायाचित्रे काढली. यानंतर त्यांनी लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून ब्लॅकमेल करणे चालू केले. यांतील ६ मुलींनी नंतर आत्महत्या केली होती.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News