Menu Close

मोरजी येथील ‘रिसॉर्ट’मध्ये दहीहंडी कार्यक्रमात बियर प्राशनाला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या आक्षेपानंतर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाकडून वादग्रस्त पोस्ट हटवून कार्यक्रम रहित करून हिंदूंची क्षमायाचना

पोलिस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर उपस्थित समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी

पणजी (गोवा) – मोरजी येथील ‘फोक्सोसो ला बीच रिसॉर्ट’मध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित ‘दहीहंडी’ कार्यक्रमात बियर प्राशन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २१ ऑगस्ट या दिवशी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली आहे. ‘रिसॉर्ट’चे संचालक जगदीश प्रजापती यांनी मांद्रे पोलीस ठाण्यात येऊन संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवून कार्यक्रम रहित केल्याचे सांगून हिंदूंची व्यवस्थापनाच्या वतीने क्षमा मागितली.

या पोस्टमध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्‍यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते. याविषयी माहिती मिळाल्यानंतर हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या शिष्टमंडळाने मांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांची भेट घेऊन ‘रिसॉर्ट’चे विज्ञापन आणि कार्यक्रमाचे आयोजन यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले. यानंतर पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांनी त्वरित ‘रिसॉर्ट’च्या संचालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. या वेळी ‘रिसॉर्ट’चे संचालक जगदीश प्रजापती यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या समोर व्यवस्थापनाच्या वतीने सर्वांची क्षमा मागितली आणि कार्यक्रम रहित केल्याचे सांगितले आणि यापुढे असा कार्यक्रम ठेवणार नाही, अशी हमी दिली.

या वेळी शिष्टमंडळामध्ये हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सलील बांदेकर, सूजन नाईक, सूरज चोडणकर, विनोद वारखंडकर, स्वरूप नाईक, विनायक च्यारी, अजित नागराज, सौ. सुनीता नागराज, सौ. उज्ज्वला गाड, सौ. हविता शेटगावकर, श्रीमती आरती फडते, गजानन पेडणेकर, हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समितीचे अंकुश नाईक, शिवा परब, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आदींची उपस्थिती होती.

पत्रकारांना अधिक माहिती देतांना शिष्टमंडळातील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सलील बांदेकर आणि सूजन नाईक म्हणाले, ‘‘या पोस्टमध्ये संपूर्ण जगात हिंदु धर्मियांना अपकीर्त करण्यात आले होते. असा प्रकार हिंदू यापुढे कदापि सहन करणार नाही.’’ ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर म्हणाल्या, ‘‘धार्मिक भावना दुखावणार्‍यांना कठोर शिक्षा करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी. गोव्यात आध्यात्मिक वारसा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन दिल्यास गोव्यात पर्यटनवृद्धी होऊन त्याचा सर्वांनाच लाभ होईल.’’ पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर शिष्टमंडळाने मोरजी पंचायतीचे सरपंच श्री. मुकेश गडेकर यांची भेट घेतली. पंचायतीचे सरपंच श्री. मुकेश गडेकर यांनी ‘संबंधित ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने हिंदूंची सार्वजनिकरित्या क्षमा मागण्यासंबंधीचा व्हिडिओ पाठवावा, यासाठी प्रयत्न करणार’, असे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी या ‘रिसॉर्ट’चे व्यवस्थापक पिंटू मंडल यांनी क्षमा मागणारा व्हिडिओ प्रसारित केला.

Related News