हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फोंडा येथे निदर्शनाद्वारे मागणी
अशी मागणी शासनाकडे का करावी लागते ? -संपादक
फोंडा (गोवा) – अल्पवयीन मुली, युवती आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात कठोरात कठोर दंड देण्याचे कायद्यात प्रावधान करणे, तसेच गोव्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करणे या मागण्या हिंदु जनजागृती समितीने फोंडा येथील क्रांती मैदानात २९ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या निदर्शनाद्वारे केल्या.
प्रारंभी सौ. सुमेधा नाईक यांनी निदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. आज महिलांची सुरक्षितता हा राष्ट्रीय स्तरावरील पुष्कळ महत्त्वाचा विषय बनला आहे. गोव्यामध्ये वर्ष २०१९ मध्ये ५१, वर्ष २०२० मध्ये ४३, वर्ष २०२१ मध्ये ४९, वर्ष २०२२ मध्ये ५५ आणि वर्ष २०२३ मध्ये ६२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. एकंदरीत स्थिती पहाता महिला आणि मुली यांनी घराबाहेर पडावे कि नाही ? असा प्रश्न निर्माण होऊन महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज गुन्हेगारांना कायद्याचे आणि दंडाचे भय नाही. काही काळाने समाज या घटना विसरतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा या घटना घडतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी आया-बहिणींवर हात टाकणार्यांचे हात आणि पाय छाटून त्यांचा ‘चौरंगा’ करण्याची शिक्षा दिल्यानंतर लगेचच अशा गुन्ह्यांचे प्रमाण थांबले होते. असा वचक गुन्हेगारांवर जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच या घटनांवर अंकुश ठेवता येऊ शकतो. यासाठी राज्यात बलात्कार्यांना भरचौकात फाशी देणे किंवा त्यांना नपुंसक बनवणे, त्यांचा चौरंगा करणे, अशा कठोर तरतुदींचा समावेश असणारा कायदा बनवावा. अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलद गती न्यायालयीन प्रक्रिया चालवावी. मुलीं-मुलांना शाळा-महाविद्यालयांमधून स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यावे. यासाठी हिंदु जनजागृती समितीची ‘रणरागिणी’ शाखा शासन किंवा शाळांचे व्यवस्थापन यांना सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे. सामाजिक माध्यमांतील ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) आणि मूव्ही प्लॅटफॉर्मवर तरुणांमध्ये अश्लीलता पसरवणारे अश्लील चित्रपट आणि ‘वेब सीरिज’ सहज उपलब्ध आहेत. या अश्लील चित्रपट (पॉर्न फिल्म्स) आणि ‘ओटीटी’ माध्यम यांना वेळीच आळा घालावा.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी काही ठराव मांडले. इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही कठोर कायदे सरकारने केले नाहीत, तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी सरकारला दिली.
आंदोलनामध्ये सहभागी संघटना : नारीशक्ती संघटना-फोंडा, इस्कॉन, भारत माता की जय, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी आणि सनातन संस्था
आंदोलनातील वक्ते : हिंदुत्वनिष्ठ श्री. महेश पारकर, नारीशक्ती फोंडाच्या सौ. अनिता कवळेकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रवीण चौधरी, हिंदुत्वनिष्ठ श्री. विनय सिंह, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट अन् सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस
वक्त्यांचे मार्गदर्शन
श्री महेश पारकर म्हणाले, ‘‘आपल्या हिंदु मुलीच या नराधमांच्या तावडीत का सापडतात ? अन्य धर्मांतील मुली कशा सुरक्षित आहेत ? हे प्रश्न प्रत्येकाला पडायला हवेत.’’
नारीशक्तीच्या प्रवक्त्या सौ. अनिता कवळेकर म्हणाल्या, ‘‘महिला सर्वच क्षेत्रांत पुढे गेलेल्या आहेत; परंतु अल्पसंख्य पुरुष त्याच महिलांना वाईट नजरेने पहात आहेत आणि त्यांचे प्राण घेत आहेत. जो मनुष्य राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही करत नाही, तो मेलेल्यासारखाच आहे.’’
सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘भारतात आधी समाज नारीशक्तीची पूजा करत होता. आता नारीशक्तीला अत्याचार सहन करावे लागतात. हे अत्याचार कोण करतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. लव्ह जिहाद हे मोठे षड्यंत्र आहे. त्यासाठी सरकार उत्तरदायी आहे. गोवा सरकारने त्वरित यासंबंधी कठोर कायदे करणे आवश्यक आहे.’’