१४ सप्टेंबर या दिवशी ‘काश्मिरी हिंदू बलीदानदिन’ झाला. त्या निमित्ताने…
‘१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, ती पहिली घटना नव्हती. त्याची पाळेमुळे १४ व्या शतकात रूजली आहेत. तेव्हापासून काश्मिरी हिंदू प्रचंड अत्याचार सहन करत आहेत.
१. वर्ष १३८९ ते १४१३ या कालावधीत सर्वप्रथम काश्मिरी हिंदूंना सामूहिकरित्या करावे लागले स्थलांतर !
१४ व्या शतकात सय्यद मीर अली हमदानी याने त्याच्या ७०० अनुयायांसह काश्मीरमध्ये प्रवेश केल्यानंतर काश्मीर खोर्यात अस्वस्थता निर्माण झाली. हमदानी याने काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या मुसलमानांच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण केला आणि सुलतान कुतूबुद्दीन शाह याला काश्मिरी हिंदूंच्या छळ करण्यासाठी प्रभावित केले. त्यामुळे जे हिंदू धर्मांतर करण्यास नकार देत, त्यांचा छळ केला जात होता.
पुढे सुलतान सिकंदर (बटशिकन) शाह याने हिंदूंची मंदिरे अपवित्र करणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे आणि हिंसाचार करून काश्मिरी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणे यांद्वारे काश्मीरमध्ये दहशत निर्माण केली. यामुळे काश्मिरी हिंदूंनी १३८९ ते १४१३ या कालावधीत सामूहिकरित्या स्थलांतर केले. काश्मिरी हिंदूंना स्थलांतर करावे लागल्याची ही पहिली घटना होती.
२. वर्ष १५०६ ते १५८५ या कालावधीत दुसर्यांदा करावे लागले स्थलांतर
शाह मीर याच्या सैन्यातील तुकडीत असलेल्या चाक्स याच्यामुळे १५०६ ते १५८५ या कालावधीत काश्मिरी हिंदूंना स्थलांतर करावे लागल्याची दुसरी घटना घडली. चाक्स हा इस्लामच्या शिया पंथातील होता. त्याचे ‘हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणे, त्यांची मालमत्ता लुटणे, जाळपोळ करणे आणि हिंदूंच्या हत्या करणे’, हे धोरण होते. चाक्स याने हिंदूंची अनेक श्रद्धास्थाने नामशेष केली. त्याने काश्मीरमधून देवाची पूजा करण्याविषयीच्या सर्व खुणा पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्यातून पलायन केले. जे राहिले, त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले अन् ज्यांनी नकार दिला, त्यांना ठार मारण्यात आले.
३. १५८५ ते १७५३ या कालावधीत तिसरे स्थलांतर!
त्यानंतर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांचा काळ हा काश्मिरी हिंदूंसाठी अतिशय वाईट होता. अकबराने काश्मिरी हिंदूंना पुनर्स्थापित केल्याचे सांगितले जाते; परंतु त्याचे वारस हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत असहिष्णु होते. विशेषतः औरंगजेब याचे संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे ध्येय होते आणि विशेषत: त्याने काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले. त्याने हिंदूंवर ‘झिजिया कर’ लादला आणि ‘धर्मांतराची प्रकिया करण्यास हिंदु विद्वानांमुळे विलंब होतो’, असा ठपका ठेऊन काश्मीरमधील हिंदु विद्वानांना संपवले. त्यामुळे वर्ष १५८५ ते १७५३ या कालावधीत काश्मीरमधील हिंदूंनी तिसर्यांदा स्थलांतर करून ते देहलीला गेले.
४. १७५३ ते १८१९ या कालावधीत चौथे आणि पाचवे स्थलांतर !
या कालावधीत अफगाण राजाच्या दुष्ट अत्याचारांना कंटाळून काश्मिरी हिंदूंनी चौथ्या वेळी स्थलांतर केले. अमिर खान जवांशीर या शिया मुसलमानाने स्वतःला ‘काश्मीरचा राज्यपाल’, असे घोषित करून मिर फजल कांथ याला मुख्यमंत्री बनवले. त्याच्या राजवटीत त्याने हिंदूंना लुटून हिंदूंच्या क्रूर हत्या केल्या. अफगाणी आक्रमणकर्त्यांची क्रूरता आणि सैतानी छळ यांमुळे काश्मिरी हिंदू निर्वासित म्हणून पूंछ अन् काबूल येथे गेले.
त्यानंतर वर्ष १८८६ मध्ये गुलशहा याच्या राजवटीत काश्मिरी हिंदूंना पाचव्यांदा काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले.
५. ब्रिटीश आणि मुसलमान यांच्या अभद्र युतीकडून हिंदूंचे सहाव्यांदा विस्थापन !
ब्रिटिशांच्या राजवटीत तरुण काश्मिरी मुसलमान पदवीधरांनी ‘मुस्लिम रिडिंग रूम’ पक्ष स्थापन केला. त्या वेळी राज्य प्रशासनामध्ये वेगवेगळ्या पदांवर असलेल्या काश्मिरी हिंदूंचा ते द्वेष करत होते. वर्ष १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारच्या पाठिंब्याने या पक्षाने हिंदूंच्या मालमत्तेची लूट करायला आणि काश्मिरी हिंदूंच्या हत्या करायला आरंभ केला. शेख अब्दुल्ला याने महाराजा हरिसिंग यांच्या विरोधात हिंदूविरोधी मोहीम चालू केली. त्याने मुसलमानांना चिथावणी दिल्याने १३ जुलै १९३१ या दिवशी मुसलमानांकडून काश्मिरी हिंदूंवर भीषण अत्याचार करण्यात आले. मुसलमानांच्या सशस्त्र टोळ्यांनी हिंसाचार करून प्रचंड अराजक निर्माण केल्याने पुन्हा एकदा वर्ष १९४८ मध्ये काश्मिरी हिंदूंनी पलायन केले.
६. काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्यातून पलायन करण्यामागील कारण
गुलशाह याच्या राजवटीत सर्वाधिक प्रमाणात संचारबंदी लागू करण्यात आली होती. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती आणि राजकीय, सामाजिक अन् आर्थिक क्षेत्रांमध्ये अराजक माजले होते. भ्रष्टाचार पुष्कळ प्रमाणात बोकाळला होता. या अन्यायाविरुद्ध जम्मूतील लोकांनी उठाव केल्यानंतर गुलशहाने ‘इस्लाम धोक्यात आहे’, असे कथानक रचून मुसलमानांना चिथवले. यामुळे मुसलमान भडकले आणि त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये हिंदूंना लुटणे, जाळपोळ करणे, हिंदु महिलांचा विनयभंग करणे, हत्या करणे आदी चालू केले. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्यातून पलायन केले.
७. वर्ष १९९० मधील सातवे स्थलांतर !
१९ जानेवारी १९९० मध्ये मात्र काश्मिरी हिंदूंना जे स्थलांतर करावे लागले, त्याच्या स्मृति प्रत्येक काश्मिरी पुरुष, महिला आणि मुले यांच्या मनावर आजही कोरल्या गेल्या आहेत. कश्यपऋषि यांचे वंशज, तसेच अनेक प्रख्यात संत, विद्वान आणि कवी यांची परंपरा असलेल्या शांतताप्रिय समाजाला भीषण अत्याचारांना सामोरे जावे लागले. या सातव्या स्थलांतराच्या मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिणामांना काश्मिरी हिंदूंना विशेषतः त्यांच्या तरुण पिढीला सामोरे जावे लागले. धर्माच्या नावाखाली क्रूरपणे केलेला छळ, घरे जाळणे, हत्या करणे, जीवे मारणे आदी भीषण गोष्टी काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात घडल्या. स्वतःच्याच मातृभूमीतून बलपूर्वक स्थलांतर कराव्या लागल्याच्या दुःखाचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाले.
८. मातृभूमीवर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी ‘पनून कश्मीर’ (आमचे काश्मीर) संघटनेची स्थापना !
या तरुण पिढीला संस्कृतीपासून वेगळे करणे आणि मातृभूमी सोडावी लागणे, यांचे दुःख वाटत होते. या दुःखाचे परिवर्तन नंतर संतापात झाले आणि त्यातून ‘सातव्यांदा काश्मिरी हिंदूंना करावे लागलेले स्थलांतर हे शेवटचे आहे’, या भूमिकेतून मातृभूमीवर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी ठराव करण्यात आला. त्यासाठी वर्ष १९९१ मध्ये ‘पनून कश्मीर’ (आमचे काश्मीर) या संघटनेची स्थापना करण्यात आली. ‘काश्मीरशी निगडीत संस्कृतीची मुळे राखून ठेवण्यासाठी आणि अगदी प्राचीन काळापासून काश्मीरमध्ये रहाणार्या काश्मिरी हिंदूंचे सामाजिक अन् राजकीय अधिकार परत मिळावेत’, यासाठी काश्मिरी हिंदूंनी उभारलेली ही चळवळ आहे. ‘पंडित (ब्राह्मण) समाज म्हणून एकत्र रहाणे आणि काश्मीर खोर्यामध्ये स्वतःची वेगळी जागा असावी, या मताला चिकटून रहाणे’, ही ‘पनून कश्मीर’ची प्रतिज्ञा आहे. २८ डिसेंबर १९९१ मध्ये ‘पनून कश्मीर’ संघटनेने केलेला मार्गदर्शक ठराव, हा या मागण्यांचा मूळ स्रोत आहे. या ठरावानुसार ‘काश्मीर खोर्यातील झेलम नदीच्या पूर्व आणि उत्तर या दिशांकडील भागांत हिंदूंना स्वतंत्र भूमी द्यावी’, अशी मागणी करण्यात आली. ‘या भूमीचा कारभार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पाहिला जावा आणि त्या भूमीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात यावा, जेथे सर्वांना जीवन जगणे, स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, विश्वास, समानता आदी मिळेल आणि तेथील रहिवाशांसाठी कायद्याचे राज्य असेल. ‘पनून कश्मीर’ संघटना स्थापन झाल्यापासून ती आणि तिची ‘युथ फॉर पनून कश्मीर’ ही युवा शाखा यांनी काश्मिरी हिंदूंचे स्वगृही पुनर्वसन व्हावे’, ही मागणी लावून धरली आहे.
विस्थापितांच्या राहुट्यांमधील नरकयातना !
जम्मू येथील निर्वासित राहुट्यांमध्ये स्थलांतरीत झालेल्या शेकडो कुटुंबांना पुष्कळ वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. राहुट्यांमध्ये झालेली गर्दी, उपासमारी, उष्णता, ह्रदयविकाराचे झटके येणे, साप चावणे यांमुळे लहान मुले आणि वयोवृद्ध माणसे यांचे झालेले मृत्यू आदी सर्व पहावे लागले. या झालेल्या आघातांमधून बाहेर पडायला काश्मिरी हिंदूंना कित्येक वर्षे लागली.
सामाजिक उपहासाचे चटके !
ज्या काश्मिरी हिंदूंना सरकारी आणि खासगी क्षेत्रात स्थिर नोकर्या होत्या, त्यांच्याकडे सरकार अन् खासगीआस्थापने यांनी पाठ फिरवली, तसेच त्यांना कोणतेही संरक्षण दिले नाही. जे तरुण नोकरीसाठी काश्मीरमध्ये परत आले, त्यांना कोणताही रोजगार मिळाला नाही. ते निराधार झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे पोषण करण्यासाठी त्यांना झगडावे लागले.
– शेहजार कौल, संयुक्त सचिव, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’.
९. ‘पनून कश्मीर’चा निर्धार आणि लढा !
काश्मीरमधून वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या हिंदूंना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागृती करण्यात ‘पनून कश्मीर’ संघटनेची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे मूळ काश्मीरमधील युवकांना त्यांच्या संस्कृतीचे मूळ आणि वारसा यांच्याशी जोडण्याची संधी मिळाली आहे. यामुळे त्यांची आकांक्षा फलद्रुप होऊन जे स्थलांतरित झालेल्या ठिकाणी जन्मले आहेत, त्यांच्यामध्ये एकत्र येण्याच्या निमित्ताने सांस्कृतिक स्थिरता येईल. सध्या विस्थापित जीवनातील अडचणी सहन करणार्या आणि स्वतःच्या पूर्वजांच्या अनुभवांचे ओझे डोक्यावर असलेल्या तरुण काश्मिरी हिंदूंची स्थिती नेहमीपेक्षा वेगळी असून
त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. काश्मिरी हिंदूंना सोडावी लागलेली पूर्वजांची घरे, मंदिरे आणि सामाजिक स्थळे, हा त्यांच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू असून त्याद्वारे त्यांच्यामध्ये काश्मीरविषयी आपलेपणाची भावना निर्माण होते. याची उणीव असल्याने त्यांच्या वारशाच्या मूर्त पैलूंशी जोडण्यासाठी हे युवक लढा देतील. काश्मिरी पंडितांच्या नवीन पिढीतील मुलांचा ते स्थलांतरीत होऊन रहात असलेल्या भागातील भाषेशी संपर्क आल्याने त्यांच्या मूळ काश्मिरी भाषेचा र्हास होत आहे. या सर्व चिंता न्यून करण्यासाठी आणि काश्मिरी हिंदूंची संस्कृती, तसेच नरसंहाराचे दुःख जिवंत ठेवण्यासाठी ‘पनून कश्मीर’ आणि ‘यूथ फॉर पनून कश्मीर’ या संघटना काश्मिरी हिंदूंच्या संघटनासाठी अथकपणे कार्यरत आहेत. काश्मीरच्या भूमीतील प्राचीन ज्ञान, वारसा, धार्मिक विधी, कला, शास्त्र, भाषा इत्यादी अमूल्य ठेवा काश्मिरी हिंदूंची आताची पिढी आणि पुढील पिढ्या यांना स्वतःच्या जन्मभूमीत जाण्याची चेतना देत राहील. काश्मिरी युवकांना स्वतःची भूमी पुन्हा प्राप्त व्हावी, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता मिळावी अन् धार्मिक स्वातंत्र्य अबाधित रहावे, या उद्देशांनी आज काश्मिरी हिंदू युवक मोठ्या प्रमाणात स्वतःच्या भूमीत (काश्मीरमध्ये) जाण्यास इच्छुक आहेत. युवा कार्यकर्ते केवळ स्वतःची भूमी परत मागत नसून तेथे संस्कृतीरक्षण करावे, काश्मिरी भाषा टिकवावी, तसेच पायाभूत सुविधा आणि वित्तीय सुरक्षा मिळावी, अशा मागण्या ते करत आहेत. ही महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘यूथ फॉर पनून कश्मीर’ संघटनेतील युवा कार्यकर्ते कार्यरत आहेत.’ (समाप्त)
– शेहजार कौल, संयुक्त सचिव, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’.