पाली सुधागड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !
पाली सुधागड (जिल्हा रायगड, महाराष्ट्र) – आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड जवळील वर्हाड (टाटाचा माळ) येथील कार्यकर्त्यांनी पाली सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले. या निवेदनाची प्रत पंतप्रधान, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे. या वेळी समितीच्या वर्हाड (टाटाचा माळ) शाखेचे शाखासेवक श्री. नरेश खंडागळे, सहशाखा सेवक श्री. विशाल देशमुख, शाखा विस्तारक श्री. रोशन खंडागळे आणि समितीचे श्री. विनोद अधिकारी, तसेच इतर समिती सदस्य उपस्थित होते.
बांगलादेशसमवेत भारताचे क्रिकेटचे २ कसोटी सामने आणि ३ टी-२० सामने १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत भारतात आयोजित करण्यात आले आहेत. हे सामने चेन्नई, कानपूर, ग्वाल्हेर, देहली आणि भाग्यनगर येथे होणार आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणात २३० हिंदूंचा मृत्यू झाला असून ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदुविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. जोपर्यंत सर्व हिंदु सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करण्यात यावेत, असे समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.