Menu Close

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांत चरबी आणि माशांचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंद करा

गोमंतक मंदिर महासंघाची पणजी येथे निदर्शनाद्वारे मागणी

पणजी येथील आझाद मैदानात आंदोलन करतांना हिंदू

पणजी (गोवा) – तिरुपती येथील श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदु समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हिंदूंचा हा विश्वासघात आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना श्री तिरुपती बालाजी मंदिराचे पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते, मंदिराच्या विश्वस्तपदी ख्रिस्ती व्यक्तींना नेमले गेले होते, मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले. प्रसादाच्या लाडवांत प्राण्यांची चरबी मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले. हे महापाप करणार्‍यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी यांनी केली. गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथील आझाद मैदानात २१ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर महासंघाच्या सदस्यांसह, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनामध्ये उपस्थित वक्त्यांच्या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला.

केवळ प्रसादाच्या लाडवांच्या प्रकरणाचीच नव्हे, तर जगनमोहन रेड्डी सरकार आणि त्यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती मंदिराशी निगडित घेतलेल्या सर्वच निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या काळातील सर्व हिंदु धर्मविरोधी निर्णय तात्काळ रहित करावे. हे प्रकरण म्हणजे मंदिर सरकारीकरणाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी अनेक धार्मिक स्थळी ‘थूंक जिहाद’, तसेच मंदिरांमधील देवाचा प्रसाद ‘हलाल उत्पादनां’पासून बनवण्याचा प्रकार समोर आला आहे. धर्मपरायण हिंदू हे कदापि सहन करू शकत नाहीत. मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा. हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी.

आंदोलनातील वक्ते

सर्वश्री जयेश थळी, राजीव झा, सूजन नाईक, स्वामी हरिश्रद्धानंदजी, अभिजीत बोरकर आणि संजीव कोरगावकर

आंदोलनातील सहभागी संघटना

आम्ही हिंदू, विश्व हिंदु परिषद, केसरिया हिंदु वाहिनी, गोवा हिंदू युवाशक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माता मंदिर समिती, वास्को; हिंदु जनजागृती समिती आणि विविध मंदिरांच्या समित्या

आंदोलनातील ठराव

१. आमच्या धार्मिक उत्सवात आणि मंदिरांत सरकारने मध्ये पडू नये.

२. वरील घटनेची सखोल चौकशी व्हावी.

३. मंदिर व्यवस्थापनामध्ये अन्य धर्मीय पदाधिकारी नकोत.

४. प्रसादाचीच नव्हे, तर जगनमोहन रेड्डी आणि आंध्रप्रदेश सरकारची सखोल चौकशी व्हावी.

५. देशभरातील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावी.

Related News