कोची (केरळ) – येथील कन्नड संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘ओणम्’ या केरळच्या सणाच्या निमित्ताने २२ सप्टेंबर या दिवशी वार्षिक बैठक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. राकेश नेल्लिताया यांनी ‘ओणम्’ या सणाविषयीची शास्त्रीय माहिती उपस्थितांना सांगितली. ‘निधर्मीवाद्यांनी पसरवलेले कथानक, त्या खोट्या विचारांचे खंडण आणि वास्तविक ओणम्, म्हणजे वामन जयंतीच आहे आणि बळीराजा हे महाविष्णूचे महान भक्त कसे होते’, हे श्री. राकेश नेल्लिताया यांनी श्रीमद्भागवत महापुराणातील अष्टम अध्यायातील काही संदर्भ देत सविस्तरपणे सांगितले. यासह श्री. राकेश यांनी ‘हिंदु धर्मावर बौद्धिक स्तरावर कसे आक्रमण केले जात आहे आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’, याविषयीही प्रबोधन केले. या प्रवचनाचा लाभ कन्नड संघाच्या ७० जणांनी घेतला. या कार्यक्रमाच्या वेळी ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.