Menu Close

राज्यात ३० सप्टेंबरपासून ‘हर घर दुर्गा’ अभियानास प्रारंभ – मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

  • तरुणींना स्वसंरक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देणार

  • नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी, हा अभियानाचा उद्देश !

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – नवरात्र अर्थात् शक्तीरूपिणी श्री दुर्गेचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी हे शक्तीचे प्रतीक असून वाईट प्रवृत्तींचा नाश करते, त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी, या उद्देशाने आम्ही ‘हर घर दुर्गा’ अभियान चालू करत आहोत, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. ३० सप्टेंबर या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ होईल. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. केरळमधील लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ या गाजलेल्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा या वेळी उपस्थित रहाणार आहेत.

‘या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वसंरक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण केवळ काही दिवसांपुरते मर्यादित नसून संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाईल. शासकीय औद्योगिक संथांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींच्या व्यतिरिक्त इतर महिलाही यामध्ये सहभागी होऊ शकतात’, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

अभियानाद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ‘ज्याप्रमाणे इतर विषयांचे अभ्यासक्रम आणि तासिका असतात, त्याप्रमाणे आत्मसंरक्षणाच्यासुद्धा तासिका असाव्यात’, अशी कॅबिनेट मंत्री लोढा यांची संकल्पना होती. त्यानुसार ‘हर घर दुर्गा अभियाना’ची निर्मिती करण्यात आली आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News