तासगाव (जिल्हा सांगली, महाराष्ट्र)– श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठांची नवरात्रोत्सवातील दुर्गादौड हिंदूंमध्ये संघटन निर्माण करते. पावसाचे वातावरण असूनही हिंदुत्वनिष्ठांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. हे बघून बाजीप्रभु देशपांडे यांनी भर पावसात पावनखिंड लढवली, त्या प्रसंगाची आज आठवण झाल्यावाचून रहात नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केले. श्री दुर्गामाता दौडीचा समारोप १२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता शिवतीर्थावर झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ४०० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. श्री. रवींद्र कुंभार यांनी श्री दुर्गादेवीचा जागर घेतला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री आनंदा धनवडे, अभिजित घुले, ऋषिकेश पेटकर, सिद्धेश्वर लांब, अथर्व जोशी, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते श्री. प्रभाकर पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्यपूर्ण
सर्वजण एकाग्रतेने जागर म्हणत होते. हिंदुत्वनिष्ठ जिज्ञासेने वक्त्यांशी संवाद साधत होते. हा कार्यक्रम वाहतुकीच्या मार्गात अत्यंत शिस्तबद्ध झाला. दुर्गादौडीचा मार्ग रांगोळ्या आणि केळीचे खुंट यांनी सुशोभित केला होता. संपूर्ण वातावरणात उत्साह जाणवत होता.
श्री. संतोष देसाई म्हणाले की, आज देव, देश आणि धर्म संकटात आहेत. वेगवेगळे जिहाद हिंदु समाजाला पोखरत आहेत. हिंदु देवतांचे होणारे विडंबन, हिंदूंच्या भूमी लाटणे, अनैतिकता, भ्रष्टाचार, हिंदु तरुणांची ढासळती मानसिकता या सर्वांवर एकच उपाय म्हणजे हिंदूंनी जातीपातीच्या राजकारणात न अडकता हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत अखंड सावध रहायला हवे. छत्रपती शिवरायांचा कर्तृत्ववान आदर्श समोर ठेवून आणि श्री दुर्गादेवीचा आशीर्वाद घेऊन हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे अखंड कार्यरत रहाणे आवश्यक आहे.