मुलांमध्ये राष्ट्र व धर्म यांविषयीचा अभिमान कसा निर्माण कराल ?

१. सद्यस्थिती

आपण सध्या मुलांचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, मुलांमध्ये राष्ट्राभिमान व धर्माभिमान यांचा खूपच अभाव जाणवतो. जर ही स्थिती अशीच राहिली, तर राष्ट्राचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा आपल्याला मुलांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.

राष्ट्रातील नागरिकांच्या एकजिनसीपणाने व संघटितपणाने राष्ट्राचे अखंडत्व टिकते. आजचे विद्यार्थीच उद्याच्या भारताचे भावी नागरिक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच प्रखर राष्ट्राभिमान निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मोठेपणी समाजासाठी म्हणजेच पर्यायाने राष्ट्रासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होऊ शकत नाही. इस्रायलच्या कित्येक पिढ्यांनंतरही जगभरात विखुरलेले नागरिक एकत्र येऊ शकले, त्या पाठीमागे त्यांच्या पुढच्या पिढ्यांत त्यांनी निर्माण केलेला प्रखर राष्ट्रवाद हेच कारण होते.

२. मुलांना योग्य दृष्टीकोन देणे (मानसिक/बौद्धिक स्तर)

इतिहास हा विषय राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी शिकवणे गरजेचे

खरेतर इतिहास विषय शिकून मुलांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण व्हायला हवा होता; पण आपले शिक्षण गुणाधिष्ठित आहे. परीक्षांचे मूल्यमापन गुणांवर केले जाते. त्यामुळे मुलांचे लक्ष गुण वाढवण्याकडेच असते. सध्या मुले सर्वच विषयांप्रमाणे `इतिहास’ हा विषय केवळ गुणांसाठी शिकतात, उदा. भगतसिंग हा विषय दहा गुणांसाठी. या पाठीमागचा मुलांचा दृष्टीकोन आपणच बदलायला हवा. इतिहास गुणांसाठी न शिकता तो त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होईल, या अनुषंगाने त्यांना शिकवायला हवा आणि हाच दृष्टीकोन पालक व शिक्षक यांनी मुलांना द्यायला हवा. जर भावी पिढी राष्ट्रप्रेमी नसेल, तर राष्ट्राचा, पर्यायाने आपला विनाश अटळ आहे. `राष्ट्र जगले, तर समाज जगेल व समाज जगला, तर मी जगीन’, हाच दृष्टीकोन पालकांनी व शिक्षकांनी मुलांमध्ये रुजवायला हवा.

३. इतिहासातील छोटी छोटी उदाहरणे देऊन मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करा !

इतिहासातील प्रसंग शिकवतांना मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होते का, ते बघावयास हवे. यासाठी मुलांचाही आढावा घ्यायला हवा, उदा. `देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. मग तो झेंडा स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर पडलेला दिसल्यावर तुला काय वाटेल ?’, असे कृतीच्या स्तरावरील प्रश्न मुलांना विचारायला हवेत. त्यातून `झेंड्याचा होणारा अवमान रोखायला हवा’, हे आपण मुलांना सांगायला हवे. राष्ट्रप्रेम निर्माण करणारे चित्रपट मुलांना दाखवायला हवेत.

४. राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांविषयी कृतज्ञतेचा भाव निर्माण करा !

स्वातंत्र्यासाठी सारे आयुष्य जीववर उदार होऊन जगणारे, तुरुंगात अनन्वित कष्ट भोगणारे स्वातंत्र्यसैनिक व क्रांतीकारक, तसेच आजही देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सारे आयुष्य पणाला लावलेले सैनिक यांच्याविषयी मुलांच्या मनात आदराचा व कृतज्ञतेचा भाव निर्माण करणे आवश्यक आहे.

५. राष्ट्रासाठी त्याग करण्याची तयारी धार्मिक अधिष्ठानामुळेच होऊ शकते !

वैयक्तिक सुखापेक्षा राष्ट्रासाठी त्याग करणे, ही अधिक योग्य गोष्ट आहे, ही संकल्पना मुलांच्या मनात रुजणे आवश्यक आहे. `त्याग’ ही गोष्ट जमण्यासाठी केवळ राष्ट्रप्रेम पुरेसे होणार नाही. त्यातून स्वार्थ व अहं या गोष्टी वाढू शकतात. परंतु धर्माचे अधिष्ठान असेल, तर निस्वार्थीपणाचा व त्यागाची भावना निर्माण होऊ शकते. यासाठी खरे राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी धर्माचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे.