नेहमी चांगल्‍या सवंगड्यांच्‍या संगतीतच रहा !

१. चांगल्या सवंगड्यांच्या सहवासात चांगल्या सवयी लागणे

‘सवंगडी म्हणजे मित्र-मैत्रिणी. आपल्या जीवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो; कारण शालेय जीवनापासून आपल्याला अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यांच्या कृती किंवा त्यांच्या सवयी यांचा आपल्या मनावर काही ना काही परिणाम होत असतो.

२. चांगल्या सवयी असलेल्या मुलांचे प्रमाण अल्प असणे

सध्या चांगले संस्कार असणारी मुले अल्प प्रमाणात दिसून येतात; मात्र बहुतांश मुलांवर वाईट संस्कार आणि त्यामुळे त्यांना वाईट सवयी असतात, असे सर्वसाधारणतः आढळून येते, असे काही ठिकाणी केलेल्या पहाणीत आढळून आले.

३. एकटेपणा आणि इतर मित्र कुचेष्टा करतील, या भीतीपोटी चांगली मुले वाईट सवयींच्या आहारी जाणे

चांगल्या सवयी असणार्‍या मुलांना वाईट सवयी असणारी मुले नेहमी चिडवतात. त्यामुळे काही मुलांना वाटते की, आपण अधिक चांगले, प्रामाणिकपणे वागलो, तर ते सर्व जण आपल्याला वाळीत टाकतील, आपल्याशी कोणी बोलणार नाही, आपल्याला कोणी खेळायला घेणार नाही. या एकटेपणाच्या भीतीपोटीसुद्धा काही मुले वेडेवाकडे प्रकार करण्यास प्रवृत्त होतात. वाईट मुले चांगल्या मुलांना चिडवून त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चांगली मुलेही आपण इतरांपेक्षा उणे (कमी) नाही, असे दाखवण्यासाठी आणि बाकीचे मित्र कुचेष्टा करतील, या भीतीपोटी वाईट सवयींच्या आहारी जातात.

४. एका नासक्या आंब्यामुळे टोपलीभर आंबे नासणे, तसेच वाईट संगतीचे असणे

एक फळे विकणारा माणूस होता. त्याच्या टोपलीत अनेक चांगले आंबे होते; मात्र त्यातील एक आंबा नासलेला होता. त्याला वाटले, ‘हा नासका आंबा चांगल्या आंब्यांच्या सान्निध्यात ठेवला, तर तो चांगला होईल’; म्हणून त्याने तो तसाच ठेवला. आठ दिवसांनंतर त्याने टोपली उघडली, तेव्हा सर्वच्या सर्व आंबे नासलेले होते. या आंब्यांप्रमाणे चांगली मुलेसुद्धा वाईट संगतीमुळे बिघडतात. हे सूत्र लक्षात घेऊन आपण चांगल्या मुलांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

५. वाईट संगतीमुळे चोरीची सवय, मादक पदार्थाच्या सेवनाचे व्यसन लागणे

कष्ट करून पैसा मिळवणारी एखादी व्यक्ती चोरांच्या संगतीत राहिली, तर त्या व्यक्तीलाही कष्ट करून पैसा मिळवण्यापेक्षा ‘चोरी करून किंमती वस्तू, दागिने आणि पैसा मिळवू या’, असा लोभ होऊ शकतो आणि ती व्यक्तीही चोरी करण्याचा मार्ग अवलंबण्यास सिद्ध होते. आजच्या काळात शाळा-महाविद्यालयात मादक पदार्थाच्या सेवनाचे व्यसनही अतिशय पसरले आहे. हा वाईट संगतीचाच परिणाम आहे. त्यामुळे आपण एखाद्याशी मैत्री करतांना त्याचा स्वभाव बघूनच करावी. आपला अधिकाधिक वेळ चांगल्या व्यक्तींसोबत घालवल्यास आपण चांगले राहू शकतो. यासंदर्भात एक गोष्ट पाहू या.

६. चांगल्याच्या संगतीत चांगल्या, तर वाईटाच्या संगतीत वाईट सवयी लागणे

एका अरण्यात एक पोपटाची मादी दोन पिल्लांना जन्म देऊन मरण पावली. त्यातील एक पिल्लू खाटकाच्या हाती, तर दुसरे पिल्लू ऋषीच्या हाती सापडले. एकदा एक राजा अरण्यातून जातांना त्याला तहान लागली; म्हणून तो पाणी पिण्यासाठी खाटकाच्या घराजवळ आला. खाटकाने पाळलेल्या त्या पोपटाने त्या राजाला उद्देशून `त्याला मारा, बडवा, जिवे मारा’, असे म्हणण्यास आरंभ केला. तेव्हा राजा तेथे पाणी न पिताच पुढे गेला. तेथे त्याला ऋषींचा आश्रम दिसला. तिथे असलेला पोपट राजा आल्याबरोबर राजाला उद्देशून म्हणाला, `या या, स्वागत आहे, विश्रांती घ्या, दूध-फळे घ्या.’ हे ऐकून त्या राजाला अतिशय आनंद झाला. यातून बोध घेण्यासारखे म्हणजे आपण ज्या कुणाच्या सहवासात असतो, त्यांच्याचप्रमाणे आमचे वर्तन असते. त्यामुळे आपण नेहमी चांगल्यांच्याच सहवासात रहावे. ८-१० मुलांच्या गटामध्ये एखादा मुलगा जरी वाईट असेल, तरी बाकीची मुले बिघडण्यास वेळ लागत नाही. तुम्हाला सारखे भांडण करणार्‍या, लबाडी करणार्‍या मुलांच्या सहवासात रहायला आवडते कि प्रेमळ, समजूतदार, प्रामाणिक अशा मुलांच्या संगतीत रहायला आवडते ? साहजिकच चांगल्या मुलांच्या संगतीत. आजकाल चांगले मित्र हे अभावानेच मिळतात. आपल्याला चांगल्या मुलांच्या संगतीत रहायचे असेल, तर आपण संस्कारवर्गाला जावे.

७. संस्कारवर्गात म्हणजेच सत्संगाला नियमितपणे जाण्याचे महत्त्व

अ. चांगली मुले संस्कारवर्गात टिकणे : संस्कारवर्गात प्रत्येक जण आपल्यावर चांगले संस्कार होण्यासाठी येतो. त्यामुळे येथे आल्यावर प्रत्येक जण आपल्यातील दोष घालवण्याचा प्रयत्न करतो. ज्या मुलांना ‘आपण चांगले व्हावे’, असे वाटते तीच मुले संस्कारवर्गाला नियमितपणे येतात; पण ज्या मुलांना ‘आपले दोष घालवावे’, असे वाटत नाही, ती मुले संस्कारवर्गाला येत नाहीत. त्यामुळे संस्कारवर्गात केवळ चांगली मुलेच टिकतात आणि त्यांना आपण आपले मित्र-मैत्रीण बनवू शकतो.

आ. संस्कारवर्गात चांगले संस्कार होतात : संस्कारवर्गात आपल्याला कळते की, उलट बोलायचे नाही, शिव्या द्यायच्या नाहीत, मारामारी करायची नाही, तसेच आळस झटकायचा. हे सर्व कळल्यावर आपण तशी कृती करतो, म्हणजेच चांगले विचार ऐकून आपण चांगले बनतो; म्हणून संस्कारवर्ग महत्त्वाचा आहे.

–  कु. गायत्री बुट्टे