नियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा !

१. नियोजन

         ‘नियोजनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण उदाहरणादाखल शाम आणि राम यांची अनुक्रमे नियोजनाचा अभाव अन् सुयोग्य नियोजन यांमुळे झालेली स्थिती पाहू या.

अ. श्यामची नियोजनाच्या अभावामुळे झालेली स्थिती : शाम मनाला येईल त्याप्रमाणे कृती करतो, म्हणजे सगळे नियोजनाशिवाय करतो. त्यामुळे प्रत्येक काम पूर्ण करण्यास त्याला अधिक वेळ लागतो. परिणामी त्याचा वेळ वाया जातो. ‘दिवसभरात आपण आणखी काय करू शकतो’, याचे त्याच्याकडून चिंतन होत नाही. किती वेळात किती कामे पूर्ण करू शकण्याची त्याची क्षमता आहे, हे तो ओळखू शकत नाही. त्यामुळे क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही आणि तो अपयशी ठरतो.

आ. रामची नियोजनामुळे झालेली स्थिती : राम आदल्या दिवशी रात्री दुसर्‍या दिवशी करायच्या कामांची यादी करून त्यांचे नियोजन करतो. त्यामुळे प्रत्येक काम करण्यास त्याला न्यूनतम वेळ लागतो. त्याच्या वेळेचा वापर सुयोग्य होऊन वेळेची बचत होते. त्याच्याकडून प्रत्येक कृती अधिक चांगली होण्याचे चिंतन होते. किती वेळेत किती कामे तो पूर्ण करू शकतो, या त्याच्या क्षमतेचा अभ्यास होतो. त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच्याकडून आणखी प्रयत्न होतात. त्यामुळे त्याला यश मिळू लागते. सगळे त्याच्यावर प्रेम करतात अन् तो सर्वांचा आवडता होतो.

          यांपैकी रामसारखी माझी स्थिती व्हावी, असे तुम्हाला वाटले असेल, तर तसे होण्यासाठी तुम्हीही प्रत्येक गोष्टीचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.

२. नियोजनाची आवश्यकता

         वेळ ही अमूल्य गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. ईश्वराने आपल्याला अमूल्य असा मनुष्यजन्म दिला आहे. आताच्या काळात मनुष्याचे आयुष्यही जेमतेम ६० ते ७० वर्षे इतके आहे. या सर्व वर्षांचा आपल्याला सदुपयोग करायचा असेल, तर वेळेचे नियोजन करावे लागेल. आयुष्य मर्यादित असल्याने जीवनातील प्रत्येक कृती वेळेवरच करणे आवश्यक आहे.

३. वेळेचे नियोजन न केल्याने दिवसभरातील बराचसा वेळ फुकट जाणे

         दिवसभरातील बराचसा वेळ आपण विनाकारण आणि नकळत फुकट घालवत असतो; कारण आपण वेळेचे नियोजन केलेले नसते. सर्वसाधारणपणे अध्र्या तासाच्या कामासाठी आपला एक ते दीड तास इतका वेळ वाया जातो; कारण आपण ती कृती अल्प वेळेत करण्याचे नियोजन केलेले नसते. अशा प्रकारे दिवसाचे बहुमूल्य ३ ते ५ तास आणि सुट्टीच्या दिवशी तर त्याहूनही अधिक वेळ आपण व्यर्थ घालवतो.

४. वेळेचे नियोजन कसे करावे ?

           वेळेचे नियोजन करतांना आपल्याला सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या कृती करायच्या आहेत, त्यांची यादी बनवावी. त्यानुसार प्रत्येक कृती किती वेळेत पूर्ण करणार, ते निश्चित करावे. याला ‘नियोजन’ असे म्हणतात.

५. नियोजनाप्रमाणे कृती करणे

           या निश्चित केलेल्या वेळेप्रमाणेच सर्व कृती करणे, म्हणजेच नियोजनाप्रमाणे कृती करणे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केल्यास वेळेची अधिक बचत होऊन अल्प वेळेत आपली अधिक कामे होतात. अशा प्रकारे वेळेचा वापर आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो.

     मुलांनो, नियोजन हा ईश्वरी गुण आपल्याला आयुष्यात सदैव उपयोगी पडतो. तो आपला बहुमूल्य वेळ आणि श्रम वाचवतो. त्यामुळे नियोजनकौशल्य शिका आणि आनंदी व्हा !

Leave a Comment