रंगपंचमी म्हणजे मुली आणि महिला यांवर फुगे मारण्याची विकृती
‘रंगपंचमीचे उदाहरण द्यायचे, तर या रंगपंचमीच्या खेळामध्ये एकमेकांवर रंग उधळायचा असतो. पूर्वी आपल्या परिचितांमध्ये हा सण खेळला जायचा.
भगवान श्रीकृष्णाने मथुरा आणि वृंदावन येथे गोप-गोपींसह रंगपंचमी खेळल्याचे प्रमाण (दाखला) आहे. त्यावरची काव्ये आणि चित्रे चांगलीच लोकप्रियही आहेत; पण आज रंगपंचमी तशी भावुक राहिलेली नाही. रंगपंचमीच्या पंधरा दिवस आधीपासूनच पाण्याने भरलेले फुगे मुली आणि महिला यांवर फेकले जातात. गाडीतून प्रवास करणार्या कितीतरी प्रवाशांना याचा अनुभव आला आहे. यातून काहींना जन्माचे वैगुण्य आले आहे. त्या विरोधात दंडक (कायदे) बनवले गेले; पण ते पुरेसे नाहीत. आजही सर्रासपणे फुगे मारण्याचा त्रास होतांना दिसतो, ही एक प्रकारची विकृती म्हणावी लागेल. अगदी शाळेतच या गोष्टीला प्रारंभ होतांना दिसतो. महाविद्यालयातील मुले-मुली आणि झोपडपट्टीतल्यांचा हैदोस यांमुळे रंगपंचमीचा ‘रंग’ बिघडला आहे.
पुराणातील कथांकडे बुरसटलेल्या दृष्टीने पहाणे
होळी, रंगपंचमी आणि धुळवड या तिन्हींना मिळून ‘होळी’ म्हटले जाते, ही आणखी एक गंमतच आहे. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसर्या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो; म्हणून ती रंगपंचमी असते; पण या तिन्हींना होळीच म्हटले जाते. होळी मुळात चालू कशी झाली, याची कथा पुराणात आहे. हिरण्यकश्यपू या दैत्याला आपला मुलगा प्रल्हाद याचे ‘नारायण वेड’ सहन झाले नाही आणि त्याने त्याला मारायचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या बहिणीलाच पाचारण केले. तिचे नाव ‘होलिका’ होते. ती क्रूर होती. प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेने अग्निकुंड प्रज्वलित केले आणि ती त्यात प्रल्हादाला ढकलायला लागली; पण त्या प्रयत्नांत तीच जळली. त्या वेळी प्रल्हादाच्या पाठीराख्यांनी हर्ष व्यक्त केला. या होलिकेवरून आणि या घटनेवरून ‘होळी’ सणास प्रारंभ झाला. हा सण, म्हणजे सुष्टांचा दृष्टांवर विजय होय. आज या कथा, कल्पना जुन्या बुरसटलेल्या समजल्या जातात.
हल्ली चोरी, जीवघेणी भांडणे अन् अपायकारक वस्तूंची आहुती म्हणजे होळी !
होळी साजरी करायचे प्रस्थ नंतर गावागावांत वाढले आणि त्यावरून जीवघेणी भांडणे होऊ लागली. दुसर्या गावातील लाकडे चोरून आणायची आणि त्यासाठी भांडाभांड करायची, यांमुळे होळी कलंकित झाली. होळीसाठी वर्गणी काढायची आणि ते पैसे मादकद्रव्यात (नशापाण्यात) उडवायचे. होळीसमोर बोंबा मारायच्या, अचकट विचकट चाळे करायचे, अशा पद्धतीने हा सण साजरा होऊ लागला. त्यामुळे सुसंस्कृत आणि सभ्य अशा कुणालाही अशा सणाचे अप्रूप वाटेनासे झाले आहे.
होळीत लाकडांपेक्षा प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळण्यास शासनाने प्रोत्साहन देणे
होळीसाठी लाकडे जाळणे, ही गोष्ट परवडेनाशी झाली; म्हणून पर्यावरणवाद्यांचा होळीला तीव्र विरोध आहे. ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ हा मंत्र सध्या महत्त्वाचा असतांना वृक्षतोडीला उत्थान देणार्या होळीची प्रतिष्ठा राखणे तसे कठीणच आहे. त्यामुळे शासनाकडून वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाऊ लागली आहे. या होळीत लाकडांपेक्षा प्लॉस्टिकच्या पिशव्या आणि आरोग्याला अपायकारक वस्तूंची आहुती देणे शासनाने ग्राह्य मानले आहे.
धुळवड म्हणजे चिखलफेक !
पूर्वी धुळवडीमागचा उद्देशही चांगला होता. त्या निमित्ताने ग्रामस्वच्छता होत असे. गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न युवकांकडून व्हायचा; पण आता त्यात मारामारी, हाणामारी येऊ लागली अन् धुळवडीचे स्वरूप चिखलफेकीचे झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात.