जगभरातील गणितींना विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ !

गोवर्धनपीठ, पुरीचे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी अपरंपार परिश्रम आणि ध्यान यांद्वारे `अथर्ववेदा’तील `सुलभसूत्र’ (गणितसूत्र) परिशिष्टातील प्रत्येक अक्षरातून १६ सूत्रे हस्तगत केली. या १६ सूत्रांमुळे अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सरळरेषा अन् गोलीय भूमिती, कॅलक्युलस, गतीशास्त्र, लोकस्थिती-गणित (स्टॅटिस्टीक्स) अशा सगळ्या शाखा अभ्यासणे सुलभ होते. प्रचंड संख्यांचे गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग करणे अतिशय सोपे होते. त्यांचा ‘वैदिक गणित’ हा ग्रंथ प्रकाशित झाला, तेव्हा सगळे जग स्तिमित झाले. आता ‘वैदिक गणिता’वर जगभरातील विद्यापिठांमधून संशोधन होत आहे.

एका पहाणीनुसार अलीकडे भारतात उच्च अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षांमध्ये सहभागी होणारे बहुतांश विद्यार्थी ‘वैदिक गणित’ मोठ्या प्रमाणात वापरतात. व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘कॅट’ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘गेट’ या परीक्षांमध्ये साध्या पद्धतीनुसार एखादे गणित सोडवण्यास चार मिनिटे लागत असतील, तर वैदिक गणितातील पद्धतींमुळे ते चार सेकंदांत सोडवता येते.