राजघराण्यात जन्माला येऊनही विरक्त भावाने कृष्णभक्तीत रमलेली आणि अतोनात छळ आनंदाने सोसून कृष्णातच विलीन झालेली थोर संत मीराबाई हिचे अल्पसे जीवनचरित्र……
पतीला वीरगती प्राप्त झाल्यावर तपस्विनीचे जीवन अनुसरणे
‘मीराबाई ही मेवाड येथील रजपूत राजा रतनसिंह यांची मुलगी. तिचा जन्म इ.स. १४९९ मध्ये झाला. बालपणापासून ती कृष्णभक्तच होती. तिला एका साधूने बालपणीच श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती. नंतर मीराबाईच्या जीवनात महात्मा रैदास हे सद्गुरुरूपाने आले.
कालांतराने चितोडचा राजा राणा संग याचा थोरला राजपुत्र भोज याच्याशी तिचा विवाह झाला. पुढे भोजराजाला एका संग्रामात वीरगती प्राप्त झाली आणि त्या वेळेपासून मीराबाई एखाद्या तपस्विनीसारखी राहू लागली. ती रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या चिंतनात निमग्न रहात असे.
मीराबाईची कृष्णभक्ती न रुचल्याने राजाने तिचा अतोनात छळ आरंभणे
भोजराजाच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ सिंहासनी विराजमान झाला. अंतःपुरवासिनी (पडदानशीन) राजपत्नीने असे वागणे तत्कालीन लोकांना रुचले नाही. त्यामुळे त्याने बहीण उदाबाई हिच्याद्वारे पेटार्यातून एक साप मीराबाईकडे पाठवला. नंतर मीराबाईने पेटारा उघडून तो साप हसत हसत स्वतःच्या गळ्यात घातला. त्याच क्षणी श्रीकृष्णाच्या कृपेने त्या सापाचे पुष्पहारात रूपांतर झाले, हे वृत्त ऐकताच तिचा दीर असलेला तो राजा अतिशय चिडला.
राजाने पाठवलेल्या विषाचा श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवल्याने ते अमृताप्रमाणे गोड लागणे; परंतु कृष्णमूर्ती हिरवी होणे
त्या राजासह सर्व लोकांनी मीराबाईचा अतोनात छळ केला. काही दिवसांनी मीराबाईसाठी राजाने उदाबाईच्या समवेत विषाचा प्याला पाठवला. मीराबाईने श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर त्या विषाचा नैवेद्य दाखवून ते प्राशन केले. तेव्हा भगवद्भावामुळे मीराबाईला ते विष अमृताप्रमाणे गोड लागले; परंतु श्रीकृष्णाची मूर्ती विषाच्या प्रभावाने हिरवी दिसू लागली. शेवटी अतिशय तगमग झालेल्या स्थितीत मीराबाईने श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘हे कालियामर्दना श्रीकृष्णा, मी विष प्राशन केल्यावर तुझा रंग का पालटला ? या विषाचा तुझ्यावर परिणाम झाला, हे पाहून मला अतिशय दुःख होत आहे. माझी ही तगमग तू लवकर पूर्ववत होऊन दूर कर.’ तत्क्षणीच ती कृष्णमूर्ती पूर्ववत दिसू लागली.
संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रममाण करणारी बहुविध पदे रचणे
त्या राजाने मीराबाईला ठार मारण्याचे अनेकविध प्रयत्न केले; परंतु सर्वशक्तीमान श्रीकृष्णापुढे त्याचे काही चालले नाही. श्रीकृष्णावाचून कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला श्रीकृष्णाविना रहाता येत नव्हते. पुढे संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रममाण करणारी बहुविध पदे रचिली. तिला अनेक साधू-संतांचा सहवास लाभला.
राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात संत श्रीकृष्णाच्या द्वारकेत गेली आणि १५४६ मध्ये ती श्रीकृष्णरूपात विलीन झाली.’
– कु. सई