स्वामी विवेकानंद यांचे पाळण्यातील नाव ‘नरेंद्र’ होते. पुढे त्यांनी ‘विवेकानंद’ असे नाव धारण केले.
नरेंद्र लहानपणी खेळात रमून जात असल्याने त्याचे वडील व्यथित होणे
नरेंद्र लहानपणी थोडा हूड होता. खेळातच तो रमून जात असे. नरेंद्रचे वडील कोलकात्यातील एक प्रख्यात अधिवक्ता (वकील) होते. एक दिवस त्यांना न्यायालयातून घरी यायला उशीर झाला. त्या वेळीही नरेंद्र बाहेर खेळतच होता. त्यांनी पत्नीला बोलावून नरेंद्रकडे बोट दाखवत म्हटले, ‘‘आपले या मुलाकडे लक्ष आहे, असे मला वाटत नाही. जर खरोखरच लक्ष असते, तर तुम्ही त्याला समजावले असते.’’ हे ऐकल्यावर आई नरेंद्रला घरात घेऊन गेली.
धर्म-अधर्माच्या लढ्यातील श्रीकृष्णासारखा सारथी होण्याचे व्यापक ध्येय आईने मुलासमोर ठेवणे
रात्री जेवण झाल्यावर सर्व जण झोपी गेले. नरेंद्र आणि त्याची आई मात्र जागेच होते. काही न बोलता आई नरेंद्रला घेऊन गीता सांगणार्या श्रीकृष्णाच्या मोठ्या चित्रासमोर येऊन उभी राहिली. ‘श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहे’, असे दृश्य असणारे ते चित्र तिला बराच आधार देई. आईने नरेंद्रला विचारले, ‘‘बाळ, तुला कोण व्हावेसे वाटते ?’’ नरेंद्रने तात्काळ उत्तर दिले, ‘‘टांगेवाला !’’ आईने पुढे विचारले, ‘‘टांगेवाला का ?’’ तेव्हा तो आनंदाने म्हणाला, ‘‘आई, बघ ! माझ्या डोळ्यांसमोर चार घोडे घेऊन चाललेला आणि उंचावर बसलेला तो टांगेवाला आहे. तो मला खुणावून विचारतो आहे की, तुझ्या हाती हे लगाम हवे आहेत का ?’’ नरेंद्रला कुरवाळत आईने सांगितले, ‘‘बाळा, मुळात ध्येय व्यापक हवे. तुला टांगेवाल्याचे, लगामाचे आणि घोड्यांचे आकर्षण आहे ना ? मग नीट लक्षपूर्वक बघ. समोरच्या चित्रात भगवान श्रीकृष्णसुद्धा सारथीच (टांगेवालाच) आहे; पण कुणाचा ? अधर्माविरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज झालेल्या अर्जुनाचा !’’
आईने व्यापक ध्येयाचा ध्यास नरेंद्रच्या मनात रुजवणे आणि आईची आर्तता त्याला समजणे
आई नरेंद्रला म्हणाली, ‘‘बाळ, केवळ व्यापक ध्येय असून चालत नाही, तर त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्याआधी शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणाविना शिकवण कशी शक्य आहे ? तर मग आता महत्त्वाचे काय, तर सतत आपल्या ध्येयाचा ध्यास ! तुझे ध्येय तुझ्या मनावर ठसू दे; पण हे काम तू आता करू शकत नाहीस; म्हणून योग्य वेळ येईपर्यंत तू तुझे सर्व लक्ष अभ्यासाकडे दे.’’ आईच्या शब्दांची नरेंद्रला खर्या अर्थाने काही उकल झाली नाही; पण तिची आर्तता मात्र त्याला समजली. नरेंद्रच्या आईने व्यापक ध्येय त्याच्या मनात रुजवले. कालांतराने नरेंद्रचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरीच्या शोधात तो सर्वत्र फिरला; पण मनासारखी नोकरी त्याला मिळाली नाही.
नरेंद्रची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाल्यावर त्यांनी नरेंद्रवर सोपवलेल्या धर्मप्रसाराच्या कार्याप्रमाणे त्याने हिंदुस्थानातच नव्हे,तर सातासमुद्रापलीकडेही ‘सनातन धर्मा’ची ध्वजा रोवणे
एक दिवस नरेंद्रचा मित्र त्याला रामकृष्ण परमहंसांकडे घेऊन गेला. रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्रला पहाताच म्हटले, ‘‘कुठे होतास इतके दिवस ? केव्हापासून मी तुझी वाट पहात आहे !’’ रामकृष्णांनी त्याच्यावर कृपेचा वर्षाव केला. धर्मप्रसाराचे मोठे कार्य रामकृष्णांनी त्याच्यावर सोपवले. हिंदुस्थानातच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडेही ‘सनातन धर्मा’ची ध्वजा नरेंद्रने (स्वामी विवेकानंद यांनी) रोवली.
मुलांनो, नरेंद्रने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याच्यासारखे व्यापक होण्याचे ध्येय ठरवले होते. तुम्हीसुद्धा धर्मप्रसाराचे व्यापक ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करा !’
– श्री. प्रसाद म्हैसकर