श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात
आदिकल्पाचिये आदीं । एकार्णवजळामघी ।
ब्रह्मा झाला जडमूढबुद्धी । सृष्टिसर्जनविधि स्फुरेना ॥३२॥
यापरी केवळ अज्ञान । नाभिकमळीं कमळासन ।
विसरलां आपणा आपण । मी हें कोण स्फुरेना त्या ॥३३॥
यालागीं श्रीनारायण । द्यावया निजात्म शुद्ध ज्ञान ।
आपुली निजमूर्ती चिदधन । तिचे दर्शन देऊं पाहे ॥३४॥
श्रीनारायणाची दिव्य मूर्ती । देखतांची स्फुरे स्फूर्ती ।
तोचि इतिहास परीक्षिती । ज्ञानगर्भ स्थिती शुक सांगे ॥३५॥
अज्ञानें जीवा जीवभाव । त्यासि द्यावया निजात्म ठाव ।
शुक सांगे सुगम उपाव । इतिहास पहाहो हरिविरंचींचा ॥३६॥
जें श्रीमुखें श्रीभगवतें । सांगीतलें विधातयातें ।
संतोषोनि उत्तम वृत्तें । निजरुपातें दावोनि तेणें ॥३७॥
जीवासी दृढ देहबुद्धी । भगवंतहि देहसंबंधी ।
तै त्यांचे भजने मोक्षसिद्धी । नघडे त्रिशुद्धि जीवासि या ॥३८॥
ऐसी उठों पाहे आशंका । तेविषयीचे उत्तर आइका ।
जीवा आणि जगन्नायका । देहसमत्व देखा नघडे ॥३९॥
जाति पाहतां दोन्ही दगड । परी रत्नगार नव्हे पडिपाड ।
तेवीं देवाजीवा समत्व दृढ । हें केवळ मानिती मूढ न ज्ञाते ॥४०॥
धूम्र ज्वाळा पाहतां दोन्ही जन्मती एके स्थानी ।
तम निवारे ज्वाळांपासुनी । धूमा नमानी तम दाटे ॥४१॥
जीव ज्ञानस्वरुप सत्य ज्ञानी । परी तो झाला देहाभिमानी ।
ज्ञान वेंचलें विषयध्यानीं । यालागी दृढबंधनीं तो पडला ॥४२॥
आपणियाचि सारिखा देख । हरि मानी पंच भौतिक ।
त्या परममूर्खातें देख । आकल्प दुःखसरेना पैं ॥४३॥
ऐसेहि जे जडमूढ मूर्ख । भावार्थे झाल्या भजनोन्मुख ।
त्यांचें निःशेष झडे दुःख । ते निजात्मसुख पावती देखा ॥४४॥
भगवद्देह चैतन्यघन । तेथें वसेना देहाभिमान ।
यालागी करितां त्याचें भजन । अज्ञान जन उद्धरती ॥४५॥
आनंदोनि बोले शुकमुनी । परीक्षिती भक्तशिरोमणी ।
जो निजदेहीं निरशिभानी । तो मी मानी परमेश्वर ॥४६॥
जो निः शेष निरभिमान । त्याचा देह तो चैतन्यघन ।
त्याचे करितां भजन । जडमूढ जन उद्धरती ॥४७॥
निरभिमानाहोनी परता । ठाव नाहीं गा परमार्था ।
तो तैच ये आपुल्या हाता । जें अनन्यता हरिभक्त ॥४८॥
हा मुख्य भगवंत भजतां । जीवासी केवी उरे अहंता
यालागीं भजनीं मुक्तता । जाण तत्त्वता परीक्षिती तूं ॥४९॥
भगवद्देहाचें श्रेष्ठपण । विशेषेंसी अतिगहन ।
त्या देहाचें होतां दर्शन । जडमूढ जन सज्ञान होती ॥५०॥
ऐसें निजदेहाचें लक्षण । जाणोनियां नारायण ।
हरावया ब्रह्मयाचें अज्ञान । निजात्मदर्शन देऊं इच्छी ॥५१॥