नाथांचें अनहंकारी आत्मनिवेदन
नुरवूनि मीतूंपणाची वार्ता । वदविताहे ग्रंथकथा ।
तेथें मी कविकर्ता । हे कोणें अहंता धरावी ॥२१॥
मज नाहीं ग्रंथ अहंता । ह्नणोनि श्रोत्यांचें विनविता ।
ते विनवणीच तत्त्वतां । अंगीं अहंता आणूं पाहे ॥२२॥
तंव माझें जें कां मीपण । तें सदगुरु झाला आपण ।
तरी करितांही विनवण । माझें मीपण मज नलगे ॥२३॥
माझी क्रिया कर्म कर्तव्यता । सदगुरुचि झाला तत्त्वतां ।
आतां माझ्या मीपणाची अहंता । मजसी सर्वथा संबंध नाहीं ॥२४॥