सदगुरुवंदन

॥ श्रीगणेशाय नमः ॥

। श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकृष्णाय नमः ।

आदीं वंदू गणनायका । नरकुंजरा अलोलिका ।
नरगजस्वरुपें तूं एका । नमन श्रीविनायका सदगुरु ॥१॥

तुज सदभावें करितां नमन । विघ्नचि होय निर्विघ्न ।
यापरी तुझी कृपा पूर्ण । चैतन्यघन गणराजा ॥२॥

सालंकृतशुक्लांबरी । हंसारुढी परमेश्वरी ।
सदगुरुरुपें वागेश्वरी । म्यां मजमाझारीं वंदिली ॥३॥

वाच्यवाचक वदता । तिहींसी आली एकात्मता ।
यापरी येथें वाग्देवता । गुरुत्वें तत्त्वतां वंदिली ॥४॥

पूर्वपरंपरा पूज्यता । एकरुप एकनाथा ।
आह्मां सदगुरुचि कुळदेवता । एकात्मता एकवीरा ॥५॥

तिचेनी नांवें माझेंही नांव । ह्नणोनि मिरवी कवि – वैभव ।
तंव नामरुपा नुरेचि ठाव । हा निजानुभव कुळदेव्या ॥६॥

आतां वंदूं संतसज्जन । जे सर्वांगी चैतन्य घन ।
ज्यां सगुण निर्गुण समसमान । जे निजजीवन सदभावा ॥७॥

ज्यांची सदभावें ऐकतां गोष्टी । चैतन्यघन होय सृष्टी ।
लागे परमानंदी दृष्टी । ऐसी कृपादृष्टी साधूंची ॥८॥

आतां वंदूं श्रीजनार्दन । ज्याचें ऐकतां एक वचन ।
त्रैलोक्य होय आनंदघन । जें निजजीवन सच्छिष्या ॥९॥

Leave a Comment