धन्य धन्य दिवस तो झाला
रोहिड्याच्या डोंगरावर
जमले रणधीर
करण्या निर्धार
बेडी हिंदूंची दूर करण्याला
धन्य धन्य दिवस तो झाला ऽ ऽ
धन्य तो मेळा
अजरामर झाला जी ऽऽ जी ऽऽ
गुरु कोंडदेव दादाजी बालशिवाजी नरसबाबाजी
मावळे जमविले कैक त्या वेळा ऽ
सांभाच्या देवळामधी
आणिला काय विधी वेळी अशी कधी
सुदिन तो झाला जी ऽऽ जी ऽऽ
रोहिडेश सांब साक्षीला ठेवून त्या वेळा
मध्यरात्रीला बोलला शिवबाळ सार्या लोकाला
का आपण जमलो या वेळा आजच्या स्थळा
सांगतो तुम्हांला जी ऽऽ जी ऽऽ
अरं घरदार लुटलं चोरानं हैराण झालो जुलमानं
हरघडी गायीची मान किती तुटती नाही त्या (प्र)माण
जर राखलं नाही गायीला धिक्कार आपल्या जगण्याला
जर राखलं नाही धर्माला थू थू रं तुमच्या जगण्याला
हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला
काय भिताय आपल्या मरणाला
आज नाही उद्या तर घाऽव मरणाचा आला जी ऽऽ जी ऽऽ
काय भिताय तुम्ही तुरुंगाला
देश सारा तुरंगच झाला
नरक बुजबुजला जी ऽऽ जी ऽऽ
नरकातले कीडे नरकात करती मौजेला
काय तुम्ही तसले हो झाला ?
छे माणूस म्हणती तुम्हाला ?
सांभाच्या शिवरपिंडीला पिंडीभवती जमला मावळा
शिवराज बोलू लागला पिंडीवरती ठेवलं हाताला
कट्यारीनं त्याच वेळेला भोसकलं आपल्या हाताला
रक्ताच्या धारेनं शिवशंकर भिजवला जी ऽऽ जी ऽऽ
रक्ताच्या धारेनं महादेव भिजवला जी ऽऽ जी ऽऽ
धन्य धन्य रोहिडा धन्य दिवस तो झाला
धन्य धन्य तो झाला जी ऽऽ जी ऽऽ
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
– राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे