गुढीपाडव्याचे महत्त्व
इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे’, असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्गाता `वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।’ असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक
या दिवशी.
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
इ. या दिवसापासूनच `शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
शुभेच्छा संदेश ! बालमित्रांनो, आपण दिवाळी किंवा जानेवारी महिन्यात नववर्षाचे शुभेच्छा संदेश आपले नातेवाईक आणि मित्र यांना पाठवत असतो. त्याऐवजी चैत्र शुद्ध प्रतिपदेस शुभेच्छा संदेश पाठवणे सुरू करावे; कारण हा खरा नववर्षारंभाचा दिवस आहे. |