गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत. गुरुकुल शिक्षणपद्धतीतच राम, कृष्ण घडले. त्यामुळे त्याची उपयोगिता अनन्यसाधारण अशीच आहे.

१. दिनचर्या

‘गुरुकुलातील दिनचर्येची शिस्त कडक असते.

अ. पहाटे ५ वाजता प्रार्थना, मग गंगास्नान, सूर्योदयाला संध्यावंदन, गायत्रीमंत्राचा जप आणि त्यानंतर सूर्यनमस्कार अथवा योगासने करायची.

आ. नंतर सकाळी ११.३० पर्यंत पाठ व्हायचा.

इ. मग माधुकरी मागायची. ब्रह्मचर्यव्रताचा एक भाग म्हणून माधुकरी अपरिहार्य असते.

ई. नंतर तासभर विश्रांती घेऊन सूर्यास्तापर्यंत पाठ चालतात.

उ. सूर्यास्ताला दहा-पंधरा मिनिटे असतांना अध्ययन थांबवायचे.

ऊ. मग सायंसंध्या नंतर स्तोत्रपाठ अल्पसा फराळ घ्यायचा.

ए. विश्रांती

२. अध्ययन-अध्यापन

नवीन पाठ सुरू झाला की, त्या नव्या पाठाचा मागच्या पाठाशी संबंध असे. पूर्वावलोकन व्हायचे. पाठ सुरू करण्यापूर्वी आचार्य दहा मिनिटे आदल्या दिवशीचा पाठ कितपत समजला, त्याची चाचणी घेत. नंतर नवा पाठ सुरू व्हायचा. विद्यार्थ्यांची तयारी होते कि नाही हे रोजच समजायचे. म्हणजे रोजच परीक्षा व्हायची. त्यामुळे परीक्षा कधी आहे, परीक्षेची तयारी कशी करायची, असे प्रश्नच नसत.

३. आर्थिक साहाय्य

आमच्या शिक्षणसंस्था कधीच शासनाच्या साहाय्यावर अवलंबून नव्हत्या आणि नाहीत. लोकच त्यांना धन देत आणि स्वतःला कृतार्थ मानीत. शासन कधीच शिक्षणव्यवस्था वा संस्थात ढवळाढवळ करीत नसे. आमच्या प्राचीन राजनीती व शासनप्रणालीचा हा दंडक होता. शिक्षण पूर्ण स्वतंत्र असे.

४. हल्लीची शिक्षणप्रणाली आणि हुशार मुलांना अल्प हुशार मुलांमुळे विषय हळूहळू शिकावे न लागणारी गुरुकुल पद्धत

समजा तुमचा मुलगा असामान्य आहे, बुद्धीमान आहे. दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम तो ३ वर्षांत सहज पूर्ण करून प्रथम श्रेणीत वरच्या क्रमांकाने उतीर्ण होईल, अशी त्याची क्षमता आहे; पण हल्ली त्याला तसा वाव नाही. इतरांबरोबरच त्याला ११ वीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्याच्या जीवनातील ८ वर्षे फुकट जातात. प्रत्येक परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल; परंतु त्याच्या आयुष्यातील जोमाची ८ वर्षे फुकट जातात.

आमच्या गुरुकुल पद्धतीत तसे होत नाही. गुरुजींकडे विद्यार्थी संहिता शिकतात. एखादा मंद विद्यार्थी साधे पुरुषसूक्त कंठस्थ करायला महिना घेतो. दुसरा विद्यार्थी ८ दिवसांत ते सूक्त म्हणतो. गुरुजी त्याला पुढचे सौरसुक्त शिकवतात. नंतर तिसरे, चौथे शिकवतात. त्याच्या प्रगतीत अन्य विद्यार्थ्यांमुळे खंड पडत नाही. काही विद्यार्थी ३ वर्षांत संहिता म्हणतात. पुढे पद, क्रम, जटा, घन इत्यादी तयारी करतात. मंद विद्यार्थ्याला कदाचित ५-६ वर्षे लागतील. या पद्धतीमुळे कुणाचेच नुकसान होत नसे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्ताहिक सनातन चिंतन, २७ डिसेंबर २००७)