बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्मप्रसार केला. परदेशातदेखील त्यांच्या प्रवचनांना प्रचंड गर्दी होत असे. अमेरिकन जनतेला तर त्यांच्या वाणीने वेड लावले होते. एकदा एक गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “महाराज, मला वाचवा. माझ्यातील दुर्गुणांमुळे माझे जगणे नरकमय झालेले आहे. कितीही प्रयत्न केले तरी वाईट सवयी काही सुटत नाहीत. त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा.'' अशी विनवणी करीत ते गृहस्थ रडू लागले. त्या गृहस्थांशी काहीही न बोलता विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितले. थोड्या वेळाने त्या गृहस्थांना घेऊन ते बागेत फिरायला गेले. वाटेत पहातात तर काय, एक शिष्य एका झाडाला मिठी मारून बसला आहे व सारखा `अरे, मला सोड, मला सोड', असे म्हणून झाडाला लाथा मारत आहे. झाडाला तर त्यानेच धरून ठेवले होते. हे पाहून ते गृहस्थ हसू लागले व म्हणाले, “महाराज, काय वेडा माणूस आहे. स्वत:च झाडाला धरले आहे आणि वर `मला सोड, मला सोड', असे म्हणत आहे. मला तर तो वेडाच वाटतो.'' विवेकानंद हसले व म्हणाले, “तुमची अवस्था पण तशीच आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ? दुर्गुणांना तुम्हीच धरून ठेवले आहे आणि ते सुटत नाहीत म्हणून तुम्ही ओरड करता.'' हे ऐकून ते गृहस्थ थोडे ओशाळले. थोडे पुढे चालून गेल्यावर एक माळी झाडांना खत घालीत असलेला दिसला. खताला दुर्गंध येत होता. त्या गृहस्थांनी नाकाला रुमाल लावला. विवेकानंद हसले. थोडे पुढे गेले. अनेक झाडांवर वेगवेगळी फुले उमललेली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ते गृहस्थ श्वास भरभरून सुगंध घेऊ लागले. त्यांचे मन प्रसन्न झाले. विवेकानंद अजूनही स्मित हास्य करीत होते. त्या गृहस्थांना थोडे आश्चर्यच वाटले. `हा माणूस वेडा तर नाही ना ? मी केवढी गंभीर समस्या घेऊन आलो आहे आणि हा तर हसतो आहे. आपली थट्टा तर करीत नाही ना ?' असा विचार त्यांच्या मनात आला. शेवटी त्यांनी विवेकानंदांना विचारले, “महाराज, आपण का हसत आहात ? माझे काही चुकले का ?'' विवेकानंद म्हणाले, “या वनस्पती, फुलेझाडे मानवाच्या दृष्टीने कितीतरी अप्रगत, मागासलेली आहेत; पण तीदेखील मिळणार्या खताच्या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधात करतात. सर्वांना तो सुगंध वाटतात अगदी काहीही हातचे राखून न ठेवता! पण एवढ्या प्रगल्भ बुद्धीचा विकसित मानव मात्र आपल्या दुर्गुणांचे सद्गुणात रूपांतर करू शकत नाही. ही फुले कोणत्याही परिस्थितीत, डोलतांना, हसतांना, अगदी खुडून घेतली तरीही सुगंध पसरवितात. आपला गुणधर्म सोडत नाहीत; पण माणूस मात्र जराशा झुळकीसरशी दोलायमान होतो.'' हे ऐकून ते गृहस्थ वरमले. त्यांना आपली चूक कळली. ते समाधानाने तेथून बाहेर पडले.
बालमित्रांनो, आपल्यालाही आपल्यातले दुर्गुण नाहीसे करायचे असतील, तर त्या माणसाने जसे आपणहूनच झाड सोडणे आवश्यक होते, तसे आपले दुर्गुण आपणच सोडायला हवेत. भगवंताच्या नामाने आपली वृत्ति आंतरबाह्य बदलते. विवेकानंदांनी दाखवून दिल्याप्रमाणे आपणही सुगंध पसरविणार्या फुलांप्रमाणे आपल्या दुर्गुणांचे सद्गुणांत रूपांतर करू शकतो. स्वामी विवेकानंदांनी स्वत: साधना केली होती व म्हणूनच ते त्या गृहस्थांचे दु:ख दूर करू शकले. आपल्या प्रखर साधनेमुळेच मरगळलेल्या समाजाला दिशा देऊ शकले. आजही कन्याकुमारी येथे असलेले स्वामी विवेकानंदांचे स्मारक त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची ग्वाही देते.