१. मुलांनो, श्री गणेशोत्सवात हे करा !
अ. ‘श्री गणपतीचा जप करा.
आ. श्री गणपतीला योग्य पद्धतीने नमस्कार करा.
इ. सुरात आरत्या म्हणा.
ई. भजन म्हणा.
उ. राष्ट्रभक्तीपर गीते म्हणा.
ऊ. स्तोत्रस्पर्धेत भाग घ्या.
ए. उत्सवात कुर्ता-पायजमा घाला.
ऐ. श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र असल्यास त्याला विरोध करा.
२. श्री गणोशोत्सवात श्री गणपतीची कृपा संपादन करण्यासाठी हे करा !
अ. चित्रपटगीतांच्या स्पर्धेवर बहिष्कार घाला.
आ. शास्त्रानुसार नसलेल्या रूपातील श्री गणपतीची मूर्ती पहायला जाऊ नका.
इ. गुलाल फेकू नका.
ई. श्री गणपतीसमोर नाचू नका.
उ. चित्रविचित्र कपडे घालू नका.
ऊ. फटाके वाजवू नका.
ए. श्री गणपतीचे कार्टून स्वरूपातील चित्रपट पाहू नका.
३. विद्यार्थ्यांच्या जीवनातील श्री गणपतीचे महत्त्व
मित्रांनो, आपण सर्व जण विद्यार्थी आहोत. विद्यार्थी म्हणजे सतत ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करणारा. मग विद्या ग्रहण करायची असेल, तर विद्यापति श्री गणपतीची कृपा संपादन केल्याविना आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. श्री गणेशचतुर्थी म्हणजे आपल्या जीवनातील महत्त्वाचा दिवस आहे. तसेच ज्या बुद्धीने आपण ज्ञान ग्रहण करतो, तिचा बुद्धीदाता श्री गणपति आहे. बुद्धी सात्त्विक असल्याविना ज्ञान आकलन होत नाही; म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण श्री गणपतीची अधिकाधिक कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करूया. खरेतर या दिवसांत पृथ्वीवर गणेशतत्त्व मोठ्या प्रमाणात जागृत असते, त्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊया. आपण श्री गणपतीला ज्या नावाने संबोधतो, त्या नावांचा अर्थ पाहूया.
३ अ. विघ्नहर्ता : आपल्या अभ्यासातील सर्व अडथळे श्री गणपति दूर करतो. आपण जर श्री गणपतीला तळमळीने प्रार्थना केली, तर श्री गणपति आपले सर्व अडथळे दूर करतो; कारण तो विघ्ने दूर करणाराच आहे.
३ आ. वक्रतुंड : जे विद्यार्थी अभ्यास करतांना वाईट मार्गाचा अवलंब करतात, उदा. नक्कल करणे (कॉपी करणे), तसेच इतरांना त्रास होईल असे वागणे-बोलणे अशा वक्र, म्हणजे वाईट मार्गाने जाणार्यांना श्री गणपति योग्य मार्गावर आणतो.
३ इ. बुद्धीदाता : श्री गणपति आपल्याला सात्त्विक बुद्धी देतो आणि ती आपल्याला सतत चांगला विचार करायला शिकवते. चांगला विचार हा आपल्याला आनंद देतो; म्हणून आपण श्री गणपतीला प्रार्थना करूया, ‘हे गणराया, मला सद्बुद्धी दे.’
३ ई. विनायक : श्री गणपति हा सर्वांचा नायक, म्हणजे नेता आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात ‘नेतृत्व’ हा गुण महत्त्वाचा आहे. आपण श्री गणपतीची कृपा संपादन करून हा गुण आत्मसात करूया.
३ उ. मंगलमूर्ती : मंगलमूर्तीची उपासना केल्यावर आपण मंगल होतो. मंगल म्हणजे पवित्र. पवित्र म्हणजे ज्याच्यात कोणतेच विकार नाहीत, असा. तेव्हा आपण आपल्यातील दोष आणि अहं दूर करूया. आपण पवित्र होऊन आनंदी होऊया आणि यासाठी श्री गणपतीला प्रार्थना करूया, ‘हे गणराया, माझ्यातील दोष आणि अहं दूर करण्याची शक्ती आणि बुद्धी दे अन् मला तुझ्यासारखे मंगल कर.’
४. विद्यार्थी मित्रांनो, श्री गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणपतीची उपासना कशी कराल ?
४ अ. श्री गणपतीचा अधिकाधिक जप करा : श्री गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात.
४ आ. प्रतिदिन अकरा वेळा संकटनाशन स्तोत्र म्हणा : या कालावधीत गणेशतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने आपल्याला याचा लाभ होऊन अभ्यासातील सर्व अडथळे दूर होतात.
४ इ. अथर्वशिर्षाचे पठण करा : मुलांनो, आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्वशिर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशिर्षाचे आपण पठण करूया.
४ ई. अधिकाधिक प्रार्थना करा : आपण ज्या भाषेत बोलतो, ती भाषा म्हणजे नादभाषा. इतर देवतांपेक्षा श्री गणपतीला आपली भाषा कळते; म्हणून आपण अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करूया.
४ उ. मानसपूजा करून कृपा संपादन करा : मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. मानसपूजेला कोणतेच बंधन नसते. आपण श्री गणपतीला आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी होऊ शकतो.
५. मित्रांनो, श्री गणेशोत्सवातील पुढील वाईट प्रकार बंद करा !
५ अ. किंचाळत आणि बेसूर आरत्या म्हणणे : अशा प्रकारे आरत्या म्हटल्याने गणेशतत्त्वाचा लाभ होत नाही, तर तेथील शक्ती नष्ट होते. आर्ततेने म्हणतात ती आरतीr. तेव्हा हा गैरप्रकार बंद करून कृपा संपादन करूया.
५ आ. फटाके वाजवणे : फटाके वाजवल्याने देवाचे चैतन्य नष्ट होते आणि वातावरणातील प्रदूषण वाढते. तेव्हा आपण हा प्रकार बंद करायला हवा, तरच श्री गणपतीची कृपा होईल.
५ इ. चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करणे: श्री गणेशोत्सवात नृत्याचा कार्यक्रम ठेवायचा असल्यास तो शास्त्रीय नृत्याचा असावा. देवतेसमोर चित्रपटांच्या गाण्यांवर नाचणे अयोग्य आहे. अशा स्पर्धेमध्ये भाग न घेणे, ही उपासनाच आहे. मुलांनो, यावर बहिष्कार घाला.
५ ई. श्री गणपतीचा मुखवटा घालून विचित्र नाचणे : श्री गणपतीचा मुखवटा घालून नाचणे, हे आपल्या देवतेचे विडंबन आहे. देवता म्हणजे खेळणे नव्हे.
५ उ. श्री गणपतीसमोर पत्ते खेळणे : आजकाल काही मुले श्री गणपतीसमोर जागरण म्हणून पत्ते खेळतात. हा प्रकार आपण थांबवायला हवा; कारण जागरण भजन म्हणून करायला हवे.
५ ऊ. ‘रिमिक्स’वर आरत्या आणि श्री गणपतीची गाणी म्हणणे : असा प्रकार आढळल्यास तो थांबवायला हवा. आरती ही भावपूर्ण आणि सुरात म्हणायला हवी.
६. मुलांनो, श्री गणपतीचे विडंबन करणारी कृत्ये करू नका !
६ अ. श्री गणपतीचे चित्र असलेले ‘टी-शर्ट’ घालणे : जिथे देवतेचे चित्र असते, तिथे ती देवता असते. ‘टी-शर्ट’वर श्री गणपतीचे चित्र असणे, हे त्याचे विडंबन आहे. ‘टी-शर्ट’ धुतांना आपण त्याचा गोळा करतो. तसेच तो कसाही ठेवतो. त्यामुळे हा प्रकार म्हणजे श्री गणपतीचे विडंबन आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगूया आणि हे विडंबन बंद करूया.
६ आ. चित्रकलेच्या नावाखाली कोणत्याही रूपात श्री गणपति काढणे : विद्यार्थी मित्रांनो, श्री गणपति कोणत्याही रूपात रेखाटणे, ही कला नव्हे, तर पाप आहे. कार्टून रूपात, तसेच कोणत्याही रूपात श्री गणपति रेखाटणे, हे विडंबन आहे. आपण आपल्या आई-वडिलांची चित्रे कोणत्याही रूपात काढू का, नाही ना ? श्री गणपति हे तर आपले आराध्य दैवत आहे. तोच आम्हाला बुद्धी देतो. मग आपल्या देवतेला असे रेखाटण्याने आपल्यावर अवकृपा होईल.
६ इ. लिखाणाच्या पुष्टीपत्रावर (पॅडवर) श्री गणपतीचे चित्र असणे : आजकाल मुले परीक्षेला जातांना लिखाण करण्यासाठी जे पुष्टीपत्र (पॅड) वापरतात, त्यावर श्री गणपतीचे चित्र असते. त्यावर उत्तरपत्रिका (पेपर) ठेवतात आणि लिखाण करतात, हे विडंबन आहे.
६ ई. कागदाच्या लगद्याचा श्री गणपति सिद्ध करणे : श्री गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची सिद्ध करतात; कारण शाडूच्या मातीत श्री गणपतीचे तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता असते; म्हणून मुलांनो, मातीचीच मूर्ती बनवा.
मुलांनो, आपण हे श्री गणेशोत्सवातील गैरप्रकार बंद करूया आणि श्री गणपतीची कृपा संपादन करूया.’
– श्री. राजेंद्र पावसकर गुरुजी, पनवेल