नवरात्र उत्सवम्हणजे आपल्यातील दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे होय. हिंदु धर्मात ‘प्रत्येक स्त्री ही दुर्गामातेचे रूप आहे’, अशी आपली श्रद्धा असल्यानेच आपण तिला आदराने वागवतो. जसे जिजाऊंनी शिवरायांना घडवले, तसेच स्त्री भावी पिढीला, म्हणजेच राष्ट्राला घडवते. स्त्री हे शक्तीचे रूप असल्याने स्त्रियांनी उपासनेने आपल्यातील शक्ती जागृत करायला हवी. सध्या स्त्रिया दुर्बळ झालेल्या असून त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता अल्प आहे; म्हणून स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली आहे. राणी लक्ष्मीबार्इंनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. आपणही आपल्यातील देवीतत्त्व भक्तीने जागृत करून स्वतःच्या आणि राष्ट्राच्या रक्षणार्थ सिद्ध व्हायला हवे. मुलींनो, स्वतःचे रक्षण करण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवात अधिकाधिक भावपूर्ण उपासना करून देवीची कृपा संपादन करूया. आपल्यातील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया. हाच खरा नवरात्रोत्सव आहे.
१. नवरात्र उत्सवात काय करावे आणि काय करू नये ?
१अ. नवरात्र उत्सवातहे करू नका !
१ अ १. चित्रपटांच्या गाण्यांवर गरबा खेळू नका.
१ अ २. राक्षसाचा किंवा विचित्र तोंडवळा असलेले मुखवटे घालून अंगविक्षेप करत नाचू नका.
१ अ ३. मुलींनो, पुरुषांचा पोषाख घालून गरबा खेळू नका.
१ अ ४. काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका : काळा रंग वातावरणातील वार्इट स्पंदने आकृष्ट करून घेतो, तर सत्त्वगुण आनंद देतो. यासाठी आपली प्रत्येक कृती सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी असायला हवी.
१ आ. नवरात्र उत्सवात हे करा !
१ आ १. सात्त्विक वेशभूषा परिधान करा : सध्या मुली स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली पुरुषांसारखी वेशभूषा परिधान करतात. स्त्रीने अशी वेशभूषा करणे, म्हणजे तिच्यातील देवीतत्त्वाचा अपमान करण्यासारखे आहे. अशा विकृत वेशभूषेने मनातील वाईट विचारांचे प्रमाण वाढते, तसेच श्री दुर्गादेवीचे चैतन्यही ग्रहण करता येत नाही. देवीला आपण प्रार्थना करूया आणि आजपासून हिंदु संस्कृतीप्रमाणे वेशभूषा परिधान करण्याचा निश्चय करूया. बाळांनो, आपण असे करणार ना ?
१ आ २. मुलींनो, नवरात्रात देवीची शक्ती मिळण्यासाठी प्रतिदिन बांगड्या आणि पैंजण परिधान करा : सध्या स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली मुली बांगड्या आणि पैंजण घालत नाहीत. देवीच्या अंगावर सर्व अलंकार आहेत. तेव्हा आपणही तसेच सात्त्विक अलंकार परिधान केले, तरच आपल्यावर देवीची कृपा होईल. प्रत्येक अलंकार हा केवळ आपण सुंदर दिसावे, यासाठी नव्हे, तर त्यातून आपल्याला देवीची शक्ती मिळते; म्हणून घालावा. देवीला आपण प्रार्थना करूया, ‘माते, मला आजपासून अलंकार घालण्याची शक्ती आणि बुद्धी दे.’
१ आ ३. आज्ञाचक्रावर कुंकू लावून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा : आज्ञाचक्रावर कुंकू लावणे, म्हणजे आपल्यातील देवीतत्त्व जागृत करणे. त्यामुळे आपल्यातील आत्मविश्वास आणि मनाची एकाग्रता वाढून भीती नाहीशी होते.
२. गरबा कसा खेळावा ?
२ अ. चित्रपटगीतांवर नको, तर देवीच्या स्तुतीपर भक्तीगितांवर नृत्य करा : गरबा खेळणे, म्हणजे आपल्यातील भक्तीभाव जागृत करणे. ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आपल्यात भाव जागृत झाला, तर आपल्यावर देवीची कृपा निश्चितच होईल. चित्रपटातील रज-तमात्मक गाण्यांतून भक्तीभाव निर्माण होणार नाही. म्हणून देवीच्या स्तुतीपर भक्तीगीतांवर नृत्य करा.
२ आ. गरबा तालबद्ध लयीत खेळा : विचित्र अंगविक्षेप करत नाचण्याने देवीकडून येणारे चैतन्य ग्रहण करता येत नाही. तसेच तेथील चैतन्यही नष्ट होते ; म्हणून तालबद्ध लयीत नृत्य करा.
२ इ. देवीचा नामजप जास्तीतजास्त करा : आपण कसे नाचतो, यापेक्षा ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ असा नामजप करत आहोत का, याकडे आपले सतत लक्ष हवे. आपला नामजप अधिकाधिक झाला, तर देवीचे चैतन्य आपल्याला ग्रहण करता येईल.
३. नवरात्रीतील देवीची उपासना
मुलांनो, नवरात्रीतील पहिले तीन दिवस आपण संकट निवारण करणार्या ‘महाकालीदेवी’ची, नंतरचे तीन दिवस ‘महालक्ष्मीदेवी’ची आणि शेवटचे तीन दिवस ‘महासरस्वतीदेवी’ची उपासना करतो.
४. श्री सरस्वतीदेवीची कृपा होण्यासाठी आवश्यक गुण
मुलांनो, आपण विद्यार्थी आहोत; म्हणून या कालावधीत सरस्वतीची जास्तीतजास्त उपासना करायला हवी; कारण ती विद्या आणि कला यांची देवता आहे. सरस्वतीदेवीची उपासना करण्यासाठी आपल्यात पुढील गुण यायला हवेत.
४ अ. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे : मित्रांनो, आपण सतत शिकत रहायला हवे. शिकण्यातच खरा आनंद आहे.
४ आ. स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करणे : आपण सतत इतरांसाठी जगले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांनी राष्ट्रासाठी त्याग केल्यामुळे ते अमर झाले. त्यांच्याप्रमाणे आपणही इतरांसाठी जगायला हवे.
४ इ. तीव्र तळमळ : मासा जसा पाण्याविना राहू शकत नाही, तसे विद्यार्थी ज्ञानाविना राहू शकत नाहीत, अशी मनाची अवस्था म्हणजेच तळमळ असायला हवी.
४ ई. चिकाटी : ज्ञान ग्रहण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. आपण कंटाळा आणि चालढकलपणा करतो. त्यामुळे ज्ञान आणि कला ग्रहण करता येत नाहीत. यामागे आपला ‘आळस’ हा दोष असतो. याचे निर्मूलन केल्याविना ज्ञान मिळणार नाही.
४ उ. एकाग्रता : मनात अनेक विचार असतील, तर ज्ञान ग्रहण करता येणार नाही. यासाठी अभ्यास करत असतांना आपले मन एकाग्र असायला हवे.
४ ऊ. सदाचरणी : आपले आचरण आदर्श हवे. कधीही खोटे बोलू नये. कुणाला दुःख होईल, असे बोलू नये. आई-वडिलांशी आदराने बोलावे.
४ ए. विनम्रता : हा सर्व गुणांचा राजा आहे. शिक्षकांशी नम्रपणे बोलावे. ‘विद्या विनयेन शोभते!’ नम्रता असेल, तर विद्यार्थ्यांवर श्री सरस्वतीदेवी लगेच प्रसन्न होते.
४ ऐ. शरणागत भाव : आपण प्रत्येक कृती करतांना सरस्वतीमातेला शरण जाऊन ‘देवीच माझ्याकडून करवून घेत आहे’, असा भाव सतत ठेवला पाहिजे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण शास्त्राप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा करून देवीची कृपा संपादन करूया. तिचे भक्त होण्यासाठी आपल्यातील महिषासुररूपी दोष आणि अहं यांचा नाश करून राष्ट्र अन् धर्म यांच्यारक्षणासाठी सिद्ध होऊया.’
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.