बर का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अतिप्रिय असणारी दूरचित्रवाणी बघण्यात तुम्ही आयुष्याचा किती वेळ घालवता याची तुम्हाला कल्पना आहे का ? मित्रांनो, आम्हाला माहित आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणीतरी व्हायचे आहे, तुमचे ध्येय गाठायचे आहे. तुमच्या आयुष्यातील एवढे तास जर तुम्ही दूरचित्रवाणी निवळ मनोरंजनासाठी पाहण्यात वाया घालवलेत, तर मोठेपणी तुम्हीच तुम्हाला क्षमा करणार नाही ! मित्रांनो, दूरचित्रवाणी एक राक्षस आहे, तुमचे डोळे बिघडवणारा, तुमचे विचार खुंटवणारा, तुमची मती मंद करणारा…! धिम्या गतीने पसरणारे ते एक विषच आहे म्हणाना ! मित्रांनो, तुमच्या मर्यादित आयुष्याचा बहुमूल्य वेळ अमेरिकेत ज्याला ‘इडियट बॉक्स’ म्हणतात, त्याच्या स्वाधीन करणार आहात का? हे दिवस आहेत तुमचे मैदानी खेळ खेळायचे, नवनवीन गोष्टी शिकण्याचे, छंद जोपासण्याचे, भरपूर व्यायाम आणि भरपूर वाचन करण्याचे ! मित्रांनो, याची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे, याच पायावर तुमच्या व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहणार आहे ! तेव्हा ‘सारा तो रिमोट बाजूला आणि हाती धरा पुस्तकाला !’ हा मूलमंत्र जगा आणि तुमचे व्यक्तीमहत्व बहुगुणी बनवा !
पालकांनीही मुलांना ठराविक कार्यक्रम बघण्याचे बंधन घातले पाहिजे. जे कार्यक्रम मुलांना बंद ते पालकांसाठीही वर्ज्य ! दूरचित्रवाणीवरील वाईट गोष्टींचा मुलांवर परिणाम होऊ नये, असे वाटत असल्यास पालकांनीही एवढा त्याग करायलाच हवा !
१. दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम
मुलांनो, तुम्हाला दूरचित्रवाणी पहाणे नक्कीच आवडत असेल; पण याचे लाभ अल्प आणि दुष्परिणामच अधिक आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? नाही ना ? मग हे दुष्परिणाम कोणते ते पुढील लेखात पाहूया !
अ. डोळ्यांची हानी होणे
मुलांनो, दूरचित्रवाणी अर्थात ‘टी.व्ही.’ सध्या सर्वांचा अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द आहे. या शब्दाने सगळ्यांवर काय जादू केली आहे, कोण जाणे ? काही मुले दूरचित्रवाणीसमोर एकाग्रतेने ठाण मांडून बसलेली असतात. त्यांना खेळायला बोलावल्यावरही ती दूरचित्रवाणी पहाणेच पसंत करतात. बहुधा अशा मुलांच्या डोळ्यांवर जाड भिंगांचे उपनेत्रही (मोठ्या नंबरचा चष्माही) असते. ‘डोळे दुखतात’, असे गार्हाणे ही मुले अधून मधून करत असतात.
आ. दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम पहात जेवल्यास त्याचा वाईट परिणाम होणे
काही मुले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघत जेवतात. त्या कार्यक्रमातील भांडण, दुःखद प्रसंग, हत्या आदींचा दुष्परिणाम जेवणावर होतो. त्यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.
इ. अयोग्य कार्यक्रम पाहिल्यामुळे कुसंस्कार होणे
अनेक मुले कौटुंबिक मालिका पहातात. त्या मालिकांत बहुधा राग-द्वेषापोटी केलेली भांडणे आणि रडारड असते. दूरचित्रवाणीवरील चित्रपट, नट-नट्यांच्या मुलाखती, अश्लील गाणी आणि नृत्ये पाहून ‘स्वतःही त्या कलाकारांप्रमाणे करावे किंवा अश्लील गाणी म्हणावी’, अशी भावना मुलांमध्ये निर्माण होते.
ई. वाईट सवयी लागून भावी आयुष्यावर विपरीत परिणाम होणे
दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपट यांमधून उलट बोलणे, चोरी करणे, मारामारी करणे, हत्या करणे, अशा अनेक कुसंस्कारजन्य गोष्टींमुळे मुले वाईट मार्गाने जाण्याची शक्यता वाढते.
भुतांच्या विषयी असलेल्या मालिका पाहून मुले घाबरतात आणि रात्री झोपेत दचकून, किंचाळून किंवा रडत उठतात.
परीक्षा जवळ आली, तरीही मुलांना दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याचा मोह आवरता येत नाही. याचा परिणाम म्हणून मुलांकडून नीट अभ्यास होत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होतो.
उ. जीवनातील अमूल्य वेळ फुकट जाणे
मुले तहान, भूक, झोप, अभ्यास, खेळ आणि इतर कामे सोडून दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात दंग झालेली दिसतात. दूरचित्रवाणी बघण्यात बालपणातील त्यांचा बराच वेळ फुकट जातो.
ऊ. मनोरंजनात गुंग झाल्याने राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कर्तव्य विसरणे आणि साधना न करणे
आजकाल दूरचित्रवाणीवर ३ ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांनाही नृत्य, गायन, अभिनय, विनोद यांसारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते. त्यांच्यासमोर नट-नट्यांचे आदर्श ठेवले जातात. या सर्व मनोरंजनात मुलांसह मोठी माणसेही स्वतःला इतके गुंतवून घेतात की, ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी नागरिकांचे काही कर्तव्य आहे’ हेच सर्व जण विसरून जातात.
देवाचा नामजप, स्तोत्रपठण इत्यादी साधना प्रत्येकानेच प्रतिदिन करणे आवश्यक आहे; परंतु सध्या सर्वांवर दूरचित्रवाणीचा एवढा प्रभाव पडला आहे की, त्यांना प्रतिदिन हे सर्व केले पाहिजे याचाच विसर पडतो.
संदर्भ: सनातन -निर्मित ग्रंथ ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’
२. दूरचित्रवाणीला दूर कसे ठेवाल ?
दूरचित्रवाणी पहाणे, हे एकप्रकारचे व्यसनच आहे. लहान, तसेच थोरांनाही ते सुटता सुटत नाही; म्हणूनच मुलांनो, तुमच्यासाठी आम्ही काही पर्याय शोधले आहेत. जीवनात ठरवलेल्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी तुम्ही अवश्य यांचा वापर करा !
अ. वाचन किंवा अन्य छंद जोपासावेत
‘दूरचित्रवाणी पाहिल्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन त्याचे ‘दूर….दर्शन’ करावे. मुलांनी या ‘इडियट बॉक्स’च्या स्वाधीन न होता पटांगणातील खेळ खेळावेत, नवनवीन गोष्टी शिकाव्यात, छंद जोपासावेत आणि व्यायाम करावा. तसेच ‘सारा तो रिमोट बाजूला आणि हाती धरा पुस्तकाला !’ हा मूलमंत्रही स्वीकारावा !
– कु. इंद्राणी पुराणिक, गोवा.
आ. दूरचित्रवाणीचा मर्यादित वापर हितकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रमांसाठी करावा
‘दूरचित्रवाणीवर मनोरंजनात्मक चित्रपट, अश्लील नृत्याचा कार्यक्रम इत्यादी निरर्थक गोष्टी पहाण्यापेक्षा रामायण, महाभारत, छ. शिवाजी महाराज या मालिका; संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांसारख्या संतांच्या जीवनावर आधारित चित्रपट किंवा क्रांतीकारकांवरील मालिका पहाव्यात. ज्ञानवृद्धी करणारे आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारे कार्यक्रम (‘डिस्कव्हरी’ आणि ‘नॅशनल जिऑग्रॉफी’ या चॅनेल्सवरील) मर्यादित वेळेत पहावेत.’
– श्री. प्रसाद म्हैसकर, पनवेल.
चला तर, आजपासून,
- दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याचा स्वतःचा वेळ प्रत्येक आठवड्याला अर्धा घंटा न्यून (कमी) करा !
- सुटीच्या दिवशी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे अत्यल्प करा !
- परीक्षा जवळ आल्यावर दूरचित्रवाणी पहाणे बंदच करा !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’