सत्त्वशील ब्राह्मण शिपाई
मंगल पांडे ३४ व्या पलटणीतील तरुण ब्राह्मण शिपाई होते. ते क्रांतीपक्षाचे सदस्य होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीवर त्या वेळी इंग्रज अधिकार्यांनी गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेल्या नव्या काडतुसांचा प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाई. त्यामुळे या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटीश अधिकार्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार) हून गोर्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला नि:शस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. आपल्या बांधवांच्या या अपमानाच्या कल्पनेने मंगल पांडे यांचे पित्त खवळले. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणारा, आचरणाने सत्शील, दिसण्यात तेजस्वी असे तरुण मंगल पांडे यांच्या पवित्र रक्तात देशस्वातंत्र्याची `विद्युत् चेतना’ संचारली. त्यांच्या तलवारीला धीर निघेनासा झाला. समोर अन्याय दिसत असतांना क्षात्रवीरांच्या तलवारी म्यानात तरी कशा रहाणार ?
कवायतीच्या मैदानात उडी !
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतीयुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांच्या अंत:करणास असह्य वेदना करू लागली. आपल्या पलटणीने आजच उत्थान केले पाहिजे, असे म्हणत मंगल पांडे यांनी त्यांची बंदूक भरून घेतली. हा दिवस होता रविवार, २९ मार्च १८५७. कवायतीच्या मैदानावर उडी घेऊन मंगल पांडे ब्रिटीश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. `मर्दहो, उठा !’ अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा नि:पात करा !!!”
हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.
देशद्रोही शेख पालटू
एवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या फलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले; पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले, “आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही”. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोर्या अधिकार्यांचे रक्त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वत:वर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले. त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटीश त्यांना पकडू शकले. जखमी झालेल्या मंगल पांडे यांना सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणार्या या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने इतर कटवाल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वत:चे प्राण देणार्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, सार्या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली.
मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी नि:शस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले. या परदास्याच्या शृंखला आजपर्यंत बाळगल्याच्या पापक्षालनार्थ त्यांनी खरोखरच भागीरथीत स्नान केले.
स्वातंत्र्यसूर्याला रक्ताचे अर्घ्य !
८ एप्रिल रोजी सकाळी मंगल पांडे यांना फाशीच्या फळीकडे नेण्यात आले. त्यांच्याभोवती सैनिकांचा पहारा होता. मंगल पांडे धीटपणे फळीवर चढले. `आपण कोणाचीही नावे सांगणार नाही’, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगताच त्यांच्या पायाखालचा आधार काढून घेण्यात आला. मातृभूमीच्या चरणांवर आपल्या रक्ताचे अर्ध्य देऊन मंगल पांडे १८५७ च्या क्रांतीयुद्धातील पहिले क्रांतीकारक ठरले. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रांतीयुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले.
८ एप्रिल १८५७ रोजी बराकपूरच्या कारागृहात मंगल पांडे यांचे धारोष्ण रक्त या हिंदभूमीवर सांडले. त्यांच्या या रक्तसिंचनातून देश आणि धर्म यांसाठी बलीदान करण्यास अनेक देशभक्त आसुसलेले होते !