१. काल्पनिक पात्रे खरोखरची शक्तीमान नसणे आणि त्यामुळे
ती आपल्याला कधीच साहाय्य करू न शकणे
आजकाल लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमान अशा प्रकारच्या काल्पनिक पात्रांच्या मनोरंजनात्मक मालिका दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येतात. ही काल्पनिक पात्रे संकटकाळात समाजाला साहाय्य करतांना आणि इतरांचे कल्याण करण्यासाठी झटतांना दिसतात. या पात्रांना उडता येते, अदृश्य होता येते, धावती आगगाडी (ट्रेन) थांबवता येते आणि बोटांमधून बंदुकीसारख्या गोळ्या किंवा विध्वंसक किरण सोडता येतात. या सर्वांच्या साहाय्याने त्यांनी वाईट व्यक्तींचा नाश केलेलाही दाखवला जातो. यामुळे मुलांमध्ये या पात्रांविषयी पुष्कळ आकर्षण निर्माण होते. त्यांना वाटते की, ही पात्रे आपल्यालाही संकटात साहाय्य करतील. मात्र ही सर्व पात्रे केवळ काल्पनिकच आहेत, त्यांना खरोखरचे अस्तित्व नाही. त्यामुळे जर आपण संकटकाळात त्यांना हाक मारली, तर ती आपल्याला कधीच साहाय्य करू शकणार नाहीत.
२. काल्पनिक पात्रे साहाय्याला येतील, असे मानून मुलांनी कृती केल्यामुळे हानी होणे
काही मुले या काल्पनिक पात्रांच्या गोष्टी पहात किंवा वाचत असतात, तसेच त्यांच्याप्रमाणे वेशभूषाही करतात. अशी पात्रे खरोखरच जिवंत आहेत, असे वाटल्याने मुलांची किती हानी होते, याचे एक उदाहरण आहे. दूरचित्रवाणीवरील ‘शक्तीमान’ या मालिकेत एक वाईट माणूस उंच इमारतीवरून मुले आणि मोठ्या माणसांना खाली फेकत असतो. त्या वेळी शक्तीमान उडत येऊन त्यांना वाचवतो. हे पाहिल्यावर ‘शक्तीमान मुलांना वाचवायला येतो’, असे वाटून काही मुलांनी खरोखरच उंच इमारतीवरून खाली उड्या मारल्या. त्या वेळी शक्तीमान त्यांना वाचवायला आला नाही, हे काही सांगायला नको.
३. काल्पनिक पात्रांच्या गतीपेक्षा मारुतीची गती अधिक असणे
आपल्याला काल्पनिक स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनचे कौतुक वाटते की, तो किती वेगाने आकाशातून उडत जातो; मात्र मारुतीची गती केवळ या काल्पनिक पात्रांपेक्षाच नव्हे, तर मनाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. प्रभु रामचंद्र आणि रावण यांच्या युद्धात इंद्रजिताने सोडलेल्या शक्तीने लक्ष्मण मूर्च्छित झाला. तेव्हा वैद्यराजांनी द्रोणागिरीवरून ‘संजीवनी’ वनस्पती आणायला सांगितली. ती आणण्यासाठी मारुतीने एका रात्रीतच कित्येक योजने उड्डाण केले. त्याने द्रोणागिरीच उचलून आणला आणि लक्ष्मण शुद्धीवर आल्यावर रातोरात तो पर्वत पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवला. हे सारे त्याने प्रचंड वेगाने केले. इतका तो शक्तीमान आणि चपळ आहे.
मारुतीची सीतेशी अशोकवनात भेट झाल्यावर मारुतीने तिला आपल्यासमवेत येण्याची प्रार्थना केली. त्या वेळी त्याचे लहान रूप पाहून सीतेला त्याच्या बळाविषयी शंका आली, तेव्हा मारुतीने तिला विशाल रूप धारण करून दाखवले.
– कु. इंद्राणी पुराणिक, गोवा.
यासाठी मुलांनो, स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमान यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवण्यापेक्षा सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी ईश्वराला जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा !